
सामना प्रतिनिधी । मोखाडा
मोखाडय़ातील मुस्लिम खाटीक व मणियार, शेख या परस्परविरोधी गटांत गेल्या दोन वर्षांपासून धुमसत असलेल्या वादाचे दंगलीत रूपांतर झाले. रमजानचा महिना सुरू असतानाही या दोन्ही गटांनी दुपारची नमाज अदा केल्यानंतर मशिदीबाहेरच तुफान हाणामारी केली. अचानक दगड-विटांचा मारा सुरू झाला. सोडावॉटरच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्याचबरोबर नंग्या तलवारीही नाचविण्यात आल्या आहेत. सुमारे एक ते दीड तास हा थरार सुरू होता. या दंगलीत सात ते आठजण जखमी झाले आहेत. दंगल घडविल्याप्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
मोखाडय़ातील मुस्लिम समाजातील खाटीक व मणियार, शेख या जमातींमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकांपासून वैर निर्माण झाले होते. सन २०१६ पासून हा वाद धुमसत होता. ७ जूनला या दोन्ही गटांतील दोन युवकांवर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आल्याचे मोखाडा पोलिसांनी सांगितले. आज दुपारी २ वाजता नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून जमाव बाहेर पडत असतानाच अचानक दगड-विटांचा मारा जमावाच्या दिशेने सुरू झाला. यामध्ये मशिदीच्या काचाही फुटल्या. सुमारे एक ते दीड तास ही धुमश्चक्री सुरू होती. ही दंगल पूर्ण नियोजन करून घडविल्याचा आरोप परस्परविरोधी दोन्ही गटांनी केला आहे. दरम्यान दंगल घडविणाऱया आरोपींना अटक करावी म्हणून मुस्लिम समाजातील मणियार, शेख जमातीचा जमाव रस्त्यावर मशिदीसमोर महिलांसह ठिय्या मांडून बसला होता. संध्याकाळी सातच्या दरम्यान पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर हा जमाक घरी परतला.



























































