
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधूनमधून एखादी जोरदार सर येऊन जात आहे; परंतु मुंबईसह उपनगरात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियाचा विळखा कायम असल्याचे मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मुंबईसह उपनगरात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. सखल भागात साचलेले पाणी ओसरले; परंतु चिखल, गटाराचे पाणी घरांमध्ये शिरले. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढले. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत मुंबईत मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदली गेली आहे. साथीच्या आजारांनी मंबईकर बेजार असल्याचे चित्र असून रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णांची गर्दी वाढताना दिसत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आजार बळावले
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साथीचे आजार बळावल्याचे समोर आले आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाचे तब्बल 5 हजार 706 रुग्ण आढळले असून डेंग्यूचे 2 हजार 319 रुग्ण आढळल्याचे मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले. लेप्टोस्पायरोसिसचाही धोका वाढला असून गॅस्ट्रो आणि काविळीचे आजारही बळावल्याचे चित्र आहे.
3,284 सोसायटय़ांमध्ये पालिकेच्या वतीने विभागस्तरावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कीटक नियंत्रण अधिकाऱयांतर्फे डास उत्पत्ती प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली. 264 शाळांमध्ये विशेष जनजागृती
सत्रे घेण्यात आली.
पाणी उकळून पिण्याचे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणीगळती आणि पाणी चोरी होत आहे. या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
साचलेल्या पाण्यातून जाऊ नका
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. या पाण्यात धम्माल मस्ती करताना विविध ठिकाणी मुले दिसली. तर गुडघाभर पाण्यातून वाट काढत कार्यालये आणि घरे गाठताना मुंबईकर दिसले; परंतु पायाला जखम झाली असेल आणि साचलेल्या पाण्यात कुत्रे, मांजरी, उंदरांचे मलमूत्र मिसळलेले असेल, पाणी दूषित असेल तर लेप्टोस्पायरोसिसचा धोका संभवतो. त्यामुळे अशा पाण्यातून जाऊ नका असे आवाहन पालिकेने केले आहे.