…म्हणून प्रत्येक मालिकेनंतर पंत क्रिकेट किट करतो दान, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या लढतीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याने नाबाद खेळी करत संघाला मालिका विजय मिळवून दिला. पंतने संयम दाखवत आणि वेळप्रसंगी आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियाला ब्रिस्बेन कसोटी जिंकून दिली. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु पंतबाबत एक आणखी खास गोष्ट जाणून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.

ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळलेल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 5 डावांमध्ये फलंदाजी करताना 274 धावा केल्या. यात त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या दोन्ही अर्धशतकीय खेळीचा टीम इंडियाला फायदा झाला. सिडनी कसोटीमध्ये पंतने केलेल्या 97 धावांच्या खेळीमुळे संघाला सामना अनिर्णित राखता आला, तर ब्रिस्बेनमध्ये ठोकलेल्या नाबाद 89 धावांमुळे टीम इंडियाला सामना जिंकता आला.

पंतचे स्थान डळमळीत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतचे संघातील स्थान डळमळीत झाले होते. पंत ऐवजी के.एल. राहुलवर सर्व जण डाव खेळण्यास तयार होते. मात्र पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळ करत सर्वांचे मन जिंकले. खराब कामगिरीनंतरही एक चांगला खेळाडू पुन्हा भरारी घेऊ शकतो हे त्याने दाखवून दिले. मैदानावर गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या पंतचा एक हळवा कोपरा मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे. पंत प्रत्येक मालिकेनंतर आपली क्रिकेट किट दान करतो.

…म्हणून करतो दान

प्रत्येक मालिकेनंतर क्रिकेट किट का दान करतो याबाबत ऋषभ पंतने ‘इंडिया टूडे’शी बोलताना खुलासा केला. बीसीसीआयशी करार झाल्यानंतर मी असे करू लागलो, असे पंतने सांगितले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला अनेकांनी मदत केली. आमचे सर मला फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठी आवश्यक साहित्य द्यायचे, यामुळे मला खूप मदत झाली, असेही पंतने आवर्जुन सांगितले. त्यामुळे ज्यूनिअर खेळाडूंना आपण क्रिकेटची किट देतो, असेही त्याने सांगितले.

घर सुचवता का घर…! ऋषभ पंतची ट्विटरवरून चाहत्यांना साद; यासाठी शोधतोय नवीन घर

तेव्हा दबावात होतो

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या दमदार कामगिरीनंतर पंतवर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी एक वेळ असा होता की मी खूप दबावात होतो, असे पंतने सांगितले. पंतकडून टीम इंडियाला खूप अपेक्षा आहेत. एम.एस. धोनीनंतर पंतच टीम इंडियाचा फिनिशर होऊ शकतो, असे सर्वांना वाटते. मात्र अनेकदा त्याने अक्षरश: विकेट फेकल्याने तो टिकेचा धनी झाला होता. परंतु अशा वेळी स्वत:वर विश्वास ठेवावा आणि चुकांमधून शिकून त्या टाळण्याचा प्रयत्न करावा, असेही पंत म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या