संगमेश्वर तालुक्यातील नद्या गाळाने भरल्या; शेतीत शिरले पाणी

352

संगमेश्‍वर तालुक्यातील नद्या गाळाने भरल्याने शेतीचे मोठे क्षेत्र पुराच्या पाण्याने वेढले जात आहे. नद्यांमधील गाळ उपसा करण्याची मागणी दरवर्षी ग्रामस्थ करतात. यावर्षी जिल्हा नियोजन समितीतून संगमेश्‍वर तालुक्यातील सोनगिरी, कोळंबे आणि मौजे कळंबस्ते मोहल्ला, काचेवाडीसाठी 17.19 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोळंबे येथे गाळ उपसा सुरुवात झाली आहे.

पावसाच्या आगमनावेळीच गाळ उपसा सुरु करण्यात आल्याने उपसलेला गाळ पुन्हा नदीच्या पात्रात जाण्याची शक्यता आहे. सोनगिरी, कोळंबे, कुरधुंडा तसेच कळंबस्ते आदी नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याचा फटका बसतो. नदीकाठची शेती वाचवावी म्हणून हा गाळ उपसा करावा, अशी शेतकरी, ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून पूर नियंत्रण कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये संगमेश्‍वर तालुक्यातील कोळंबे सोनगिरी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी 20.13 लाख रुपयांच्या रक्कमेसाठी तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्याअन्वये 10.06 रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तर मौजे कळंबस्ते मोहल्ला 14.26 लाख तांत्रिक मान्यता घेण्यात आली असून 7.13 लाख रक्कम वितरीत करण्यात आली आहे. ऐन पावसाच्या तोंडावर कोळंबे येथील गाळ उपसा सुरु करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने उपसलेला गाळ पुन्हा नदीच्या पात्रात जाणार आहे. अलोरे येथील यांत्रिक विभागाच्यावतीने हे काम करण्यात येत आहे. मात्र, ऐन पावसाचा तोंडावर हे काम करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्‍न येथील ग्रामस्थ विचारत आहेत. लाखो रुपये खर्च करुन सुरु करण्यात आलेले काम चांगले करावे अन्यथा दरवर्षी पुराची पाण्याची समस्या कायम राहणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या