Bihar election 2025 – राजदची 143 उमदेवारांची यादी जाहीर; तेजस्वी यादव राघोपूरमधून रिंगणात, तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत

राष्ट्रीय जनता दल (राजद) ने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाआघाडीमध्ये जागावाटपावरून कलगीतुरा सुरू असल्याने राजदने आतापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती, मात्र सोमवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राजदने यादी जाहीर केली.

माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे पारंपरिक राघोपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. मधेपुरातून चंद्रशेखर यांना, तर मोकामामधून सूरजभान सिंह यांची पत्नी वीणा देवी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर झाझा मतदारसंघातून नारायण चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान, राजदची यादी जाहीर होताच तीन मतदारसंघामध्ये महाआघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. वैशालीतून काँग्रेसच्या अजय कुशवाहा यांचा सामना राजदच्या संजीव कुमार यांच्याशी होईल. लालगंजमध्ये काँग्रेस उमेदवार आदित्य कुमार आणि राजदच्या शिवानी शुक्ला यांच्यात सामना होईल, तर सिकंदरा मतदारसंघात काँग्रेसच्या विनोद चौधरी यांचा सामना राजदच्या उदय नारायण चौधरी यांच्याशी होईल.

कहलगाववर सस्पेन्स कायम

दरम्यान, कहलगाव मतदारसंघावर सस्पेन्स कायम आहे. येथे प्रवीण कुशवाह आणि राजदचे रजनीश आनंद यांच्यात सामना होण्याची शक्यता आहगे. अर्थात कुशवाह यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही. सोमवारी दुपारपर्यंत ते अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.