
राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी ती कुचकामी ठरत असल्यचे समोर आले आहे. नुकत्याच संपलेल्या 2023 या वर्षात राज्यात तब्बल 34 हजार 114 अपघात झाले आहेत. मागील वर्षाचा विचार करता 731 अपघात वाढले आहे. दरम्यान अपघात वाढले असले तरी त्यामध्ये जाणाऱया बळींची संख्या मात्र घटली आहे.
राज्याच्या परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून राज्यातील अपघाताचे वास्तव समोर आले आहे. 2022मध्ये राज्यात 33 हजार 383 अपघात झाले होते. त्यामध्ये 15 हजार 224 जणांचा बळी गेला होता. तर नुकत्याच संपलेल्या वर्षात 34 हजार 114 अपघातांमध्ये 15 हजार 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावरून अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे, तर अपघातामधील मृतांच्या संख्या 215ने घटली आहे.
मृतांची संख्या मात्र घटली
मुंबईतील अपघात कमी झाले
मुंबई शहर आणि उपनगरात मागील वर्षी 1895 अपघातांमध्ये 371 जणांचा बळी गेला आहे. मात्र नुकत्याच संपलेल्या वर्षात 1473 अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये 283 लोकांचा बळी गेला आहे.
रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात
राज्याच्या परिवहन विभागाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी आजपासून रस्ता सुरक्षा अभियान सुरू केले असून त्याची सुरुवात मुंबईतून झाली आहे. महिनाभर हे अभियान चालणार असून प्रत्येक जिह्यात होणार आहे. त्यानुसार वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार आहे.


























































