राहाता – खड्ड्यात व चिखलात हरवले रस्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, राहाता

राहाता शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवून दिली. मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांवरूनही पाणी वाहू लागलं होतं. पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्याने विविध भागातील रस्ते चिखलात हरवले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ड्रेनेजची कामे केल्याने चांगले रस्तेही खड्ड्यांनी व चिखलाने व्यापले आहेत. यामुळे शहरवासियांमध्ये संताप पसरला आहे.

शहरातील जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कोणी वालीच राहील नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात पहिल्याच पावसाने नगरपालिकेचे दावे फोल ठरवले आहेत. नालेसफाई तर नाहीच रस्त्यांचाही बोजवारा उडाला आहे. रस्ते खोदून भुयारी गटारीचे काम केले गेले. परंतु काम झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवले नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकरुची नगर, चितळीरोड लगतही खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. महात्मा फुले नगर येथील प्रशस्त असलेला रस्ता चिखलात हरवला आहे. चिखलातून वाट काढताना जनतेला खड्ड्यात पडण्याची वेळ आली आहे. रविवारच्या पहिल्याच पावसात नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अर्धा डझन वाहने खड्ड्यात फसली. एक महिलाही खड्ड्यात अडकली. नागरिकांच्या मदतीने तिला ओढून बाहेर काढावे लागले. परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्षापासून नगरसेवकांपर्यत सातत्याने प्रश्न मांडले. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केल जात असल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील सर्वच रस्ते पालिकेने मधोमध खोदले. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. हे खोदलेले रस्ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबधित ठेकेदाराची असताना सहा महिन्यात त्याने कोणताही रस्ता दुरुस्त न केल्याने ही वेळ आली आहे.