शासकीय वाळूउपसा करण्यासाठी ओढय़ामध्ये महसूल विभागाने तयार केलेल्या मुरुमाच्या रस्त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाले असून, विहिरीचे पाणीदेखील दूषित झाल्याने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, याबाबत कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावच्या पश्चिमेस मशिद कब्रस्तानजवळ पाणंद ओढय़ात वाळू काढण्यासाठी महसूल विभागाने ठेकेदाराकडून रस्ता केला होता. यावेळी ओढय़ाच्या लांबी-रुंदीचा ताळमेळ न घालता रस्ता करण्यात आला. गावच्या सांडपाण्याच्या गटारीसह लगतच्या शेतीत फळझाडे व उभ्या पिकात मुरुम टाकून रस्ता करण्यात आल्याने पावसाच्या पाण्यासह गावचे सांडपाणी विहिरीत झिरपले, त्यामुळे पाणी दूषित झाले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या शेतालगत गावठाण हद्द आहे. याच ठिकाणाहून पूर्वी पोई म्हणून नाला होता. पुढे त्यालाच पाणंद ओढा म्हणून नाव पडले होते. या ओढय़ाची लांबी-रुंदी खोली कुणालाही माहीत नाही. गावच्या काही मंडळींनी मंडलाधिकारी, तलाठी, तहसीलदार व महसुलातील इतर कर्मचारी यांनी शासकीय वाळू काढण्याच्या नावाखाली भूमी अभिलेख विभागाला पाचारण केले. यानंतर तीन वेगवेगळ्या मोजण्या करण्यात आल्या. या तिन्हीही मोजणीत तफावत आढळल्याने शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या. असे असताना प्रशासनाचा धाक दाखवत वाळू ठेकेदाराने गावच्या सांडपाण्याची गटार तोडली तसेच लगतच्या शेतकऱ्यांची सुमारे 100 फळझाडे तोडून उभ्या पिकात जेसीबी घातला. यानंतर 500 डंपर मुरुम टाकूत रस्ता बनवण्यात आला आणि हजारो ब्रास वाळू काढण्यात आली.
शासकीय काम असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला नाही. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने पावसाचे पाणी आणि गावच्या गटारीचे सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत व शेतात उतरल्याने विहिरीचे पाणी दूषित होत आहे. या पाण्यामुळे शेतातील उभे पिके सडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच फळझाडाचे नुकसान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसांत कारवाई करावी. तसेच, हद्दी व खुणा ठरविण्यात याव्यात. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास कुटुंबासह बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी देवराम गायकवाड, नानासाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अनिल गायकवाड, कादर सय्यद, मोसीन सय्यद, दगडू गायकवाड, गोविंद गायकवाड, इन्नुस सय्यद, गोविंद गायकवाड, सुभाष गायकवाड, विजय गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, मुसा सय्यद आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयांना पाठवण्यात आल्या आहेत.
गावचे सांडपाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी सन 2022 साली ग्रामपंचायत कार्यालयासमोर उषोषण केल्यानंतर गटार करण्यात आली. मात्र, वाळू ठेकेदाराने ती बंद करत माझ्या उभ्या पिकात जेसीबी घालून नुकसान केले. सध्या माझ्या शेतात गावच्या गटाराचे व पावसाचे पाणी शिरल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके नष्ट होत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ न्याय मिळवून द्यावा; अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करणार.
– इन्नुस छन्नुमिया सय्यद, बाधित शेतकरी, आश्वी खुर्द.