
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकारातून ’संडे स्ट्रीट’ हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार बोरीवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी वायएमसीए गार्डनाचा रस्ता आता संडे स्ट्रीट झाला असून आज पहिल्याच दिवशी परिसरातील अबालवृद्धांनी रस्त्यावर उतरत संडे स्ट्रीटचा आनंद लुटला.
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या पुढाकारातून ’संडे स्ट्रीट’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. रस्त्यावर उतरून मनोरंजन, योग, स्केटींग, सायकलिंगसह सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेता यावा हा याचा उद्देश आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी आयसी कॉलनी वायएमसीए रस्ता संडे स्ट्रीट म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त संजय पांडे यांनी सदर रस्ता संडे स्ट्रीट म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार दर रविवारी येथील वाहतूक पूर्णतः बंद ठेवून हा रस्ता आबाल वृद्धांसाठी मोकळा ठेवण्यात येणार आहे.
संडे स्ट्रीटच्या आज पहिल्याच दिवशी मोठय़ा संख्येने आबालवृद्धांनी रस्त्यावर उतरत मनोरंजन, योग, स्केटिंग करत संडे स्ट्रीटचा आनंद लुटला. यावेळी पोलीस आयुक्त संजय पांडे, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक, मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, वाहतूक पोलीस निरीक्षक आवटे, एम एच बी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा उपस्थित होते. यावेळी पांडे यांच्या हस्ते अनेकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. दर रविवारी मुंबईतील विविध ठिकाणचे सहा रस्ते या उपक्रमासाठी राखीव ठेवले होते. त्यानंतर मुंबईकरांचा संडे स्ट्रीटला वाढता प्रतिसाद पाहता यामध्ये आणखी 3 मार्गांची वाढ करण्यात आली आहे.

























































