
रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यात अपयशी ठरल्याची स्पष्ट कबुली केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ‘आज तक’च्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी ही कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी देशभरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची आणि योजनांची माहिती दिली.
नितीन गडकरी म्हणाले की, माझ्या अधिपत्याखालील मंत्रालयाने सर्व क्षेत्रात यश मिळवले, मात्र गेल्या पाच वर्षात रस्ते अपघात रोखू शकलो नाही, हे मी माझे अपयशच मानतो. प्रत्येक वर्षी पाच लाख अपघात होतात आणि दीड लाख लोकांचा यात मृत्यू होता. मृतांमध्ये 18 ते 35 वयोगटातील लोकांची संख्या 65 टक्के आहे, असेही गडकरी म्हणाले. तसेच नवीन मोटार वाहन कायदा एक वर्ष राज्यसभेत रेंगाळत राहिला आणि नंतर पास झाला, असेही ते म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले की, दिवसाला 40 किलोमीटर रस्ता बनवण्याचे आमचे लक्ष्य असून आम्ही आतापर्यंत 32 किलोमीटर रस्ता दिवसाला बनवत आहोत. 2020 पर्यंत आम्ही आमचे लक्ष्य साध्य करू. अशाच पद्धतीने 5 कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देणे हे देखील आमचे लक्ष्य आहे, असेही गडकरी म्हणाले.

























































