ऑनलाईन ओळख महागात; गुंगीचे औषध देत तरुणाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेशी ऑनलाईन ओळख करून तिला भेटणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी घरी बोलविले असता त्या महिलेने तरुणाला पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. त्यानंतर तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन, दोन अंगठ्या आणि आयफोनचा हेडफोन घेऊन महिलेने पोबारा केला आहे. या प्रकरणी शिवराज सुरज शिंदे (वय 28, रा. कृष्णा हाईट्स, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शिखा नलावडे पाटील या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी महिला यांची सोशल साईटवर ओळख झाली. त्यानंतर ते दोघे शिवाजीनगर येथे भेटले. त्यानंतर दोघेही जेवण करण्यासाठी तक्रारदाराच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर तक्रारदार लघूशंकेसाठी गेले असता आरोपी महिलेने त्यांच्या पाण्याच्या ग्लासमध्ये गुंगीचे औषध टाकले. पाणी घेतल्यानंतर तक्रारदारांना गुंगी आली आणि ते झोपले. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चेन आणि आयफोनचे हेडफोन लांबवत पोबारा केला. या प्रकरणी देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.