
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नामवंत वकीलाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी 23 लाखाचा ऐवज आणि रिव्हॉल्वर पळविला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नानलपेठ पोलीस करत आहेत.
शहरातील नानलपेठ भागात अॅड. रामेश्वर सोमाणी यांचे निवासस्थान आहे. सोमाणी हे सध्या आळंदी येथे गेले आहेत. तसेच त्यांचा मुलगा हा देखील नांदेड येथे गेला आहे. घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून घरातील कपाटात असलेली लाखों रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौलवान वस्तु असा एकूण 22 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याच कपाटात असलेली संरक्षणार्थ ठेवलेली रिव्हॉल्वरही चोरट्यांनी लंपास केली.
सदर घटना रविवारी पहाटे 3 ते 4 दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रामेश्वर सोमाणी यांचे सुपूत्र राजेश सोमानी यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत चोरट्यांनी घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत कपाटातील रोकड व दागिने तसेच रिव्हॉल्वरही चोरल्याचे म्हटले आहे. या चोरट्यांनी घरात आणखी काही वस्तु लंपास केल्याचे निदर्शनास येत असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पुरवणी तक्रारीह दाखल करण्यात आली असल्याचे समजते.
या घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात राजेश सोमानी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याने परभणी शहरातील भरवस्तीत चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नानलपेठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





























































