
तालुक्यातील धानोरे येथील दिघे वस्तीवर 5 ते 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकून साडेचार लाख रुपयांचे सोने व 55 हजारांची रोकड लुटून नेली आहे. मंगळवारी (दि. 20) रात्री ही घटना घडली. याबाबत राहुरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 12 वाजता धानोरे येथील दिघे वस्तीवर 5 ते 6 दरोडेखोरांनी अरुण लहानू दिघे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी घरात झोपलेल्या दिघे कुटुंबाच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर घरातील कपाटाची उचकापाचक करत कपाटातील लॉकर तोडून त्यामधील साडेचार लाख रुपये किमतीचे सोने तसेच 55 हजारांची रोकड काढून घेतली. कपाटातील लॉकर घराबाहेर फेकून दरोडेखोर पसार झाले.
या घटनेची खबर मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राहुरी पोलिसांनी बुधवारी सकाळी दिघे वस्तीवर जाऊन पाहणी केली. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी नगर येथून श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानाने दिघे वस्तीच्या पाठीमागे असलेल्या कपाशीच्या पिकापर्यंत माग काढला. प्रवरा पट्टय़ातील धानोरे भागात चोऱ्या व घरफोडय़ांच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अद्यापि एकाही घटनेचा तपास पोलिसांना लागला नसतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


























































