
सामना प्रतिनिधी। हिंगोली
शहरातील बांगरनगरमध्ये गुरुवारी भरदुपारी चोरट्यांनी घरफोडी केली असून कपाटातून १० तोळे सोने आणि रोख दहा हजार रुपये लंपास केले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हिंगोली शहराच्या नांदेड ते हिंगोली रस्त्यावरील बांगरनगर भागामधील रहिवासी सुर्यकांत परसराम बांगर हे त्यांच्या मुलाच्या शालेय प्रवेशासाठी शाळेमध्ये गेले होते. दुपारी साडे बारा ते एक वाच्या दरम्यान बांगर कुटूंबीय घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बांगर यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले दहा तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख दहा हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केले. शाळेतून घरी परत आल्यावर बांगर कुटूंबीयांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे व कपाटातील सोने गायब असल्याबरोबरच घरातील सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी ताबडतोब याबद्दल पोलिसांना कळवले. दरम्यान, याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल ’दैनिक सामना’शी बोलतांना म्हणाले की, शहरात दुपारी चोरी झाल्याच्या घटनेची माहिती मिळाली असून अद्याप याबाबतची फिर्याद प्राप्त झालेली नाही.
































































