
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये दगडफेक करून पाच दरोडेखोरांनी 45 तोळे दागिने पळवले. तसेच दोन ठिकानी लूटमार करून 1 लाख 43 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडोखोरांच्या धुमाकुळामुळे अंबड तालुक्यासह परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
वडीगोद्री येथील श्रीमंत तुकाराम खटके यांचे संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत घर आहे. खटके यांच्या घरात दिवाळसणासाठी दोन मुलीही आल्याने त्यांची पत्नी,मुलगा आणि ते झोपले होते. त्यावेळी आलेल्या दरोडेखोरांनी शेजारी असलेल्या घरांच्या बाहेरून कडया लावल्या. घराच्या बाजूचे प्रवेशद्वार तोडून तीन दरोडेखोर आत शिरले. तर दोन दरोडेखोर प्रवेशद्वाराजवळ दगड घेऊन उभे होते. यातील तीन दरोडेखोर आत शिरताच त्यांच्या आवाजाने खटके कुंटुंबीय जागे झाले.
दरोडेखोरांना पाहून त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत त्यांना धमकावत शांत राहण्यास सांगितले. शेजारीपाजारी मदतीला बाहेर येऊ नये, यासाठी दरोडेखोरांनी त्यांच्या घराला बाहेरून कडया लावल्या होत्या. मात्र, राजेंद्र खटके आणि विष्णुदास खटके मागच्या दरवाजाने बाहेर आले. तेव्हा बाहेर थांबलेल्या दोन दरोडेखोरांनी दगडफेक करत त्यांना मदतीसाठी जवळ येऊन दिले नाही.
तोपर्यंत आतील दरोडेखोरांनी गंगुबाई साहेबराव आटोळे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळयातील आणि कानातील एक तोळे सोन्याचे दागिने हिसकावले. कपाट फोडून कपाटातील राणीहार, साडेचार तोळे सोने, साडेतीन तोळयाचे 2 गंठण , 12 अंगठ्या ( सुमारे15 तोळे), कानातील 6 वेलदोडे, 5 तोळयाचे ब्रासलेट, 3 तोळयाचे नेकलेस, सोन्याच्या 5 तोळयाच्या बांगड्या असे एकूण 40 तोळे सोने आणि 1 लाख 42 हजार रोख रक्कमेसह कपाटातील कागदपत्रे घेऊन दरोडेखोरांनी मागच्या दरवाजाने उसाच्या शेतात पळ काढला. कपाटातील कागदपत्रे उसाच्या शेतात फेकून दिली आणि सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले. दरोडेखोरांनी श्रीकांत विठ्ठल कोकणे यांच्या घरावर राहणाऱ्या मजुराचे 1200 रुपये तसेच एक मोबाईल लंपास केला.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख गोंदी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, अंबड आणि घनसावंगी पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने घराच्या पाठीमागे उसापर्यंत माग काढला.मात्र, उसाला पाणी देण्यात आले होते. तसेच दरोडेखोरांनी चिखलातून पळ काढल्याने अधिक माग लागला नाही. घटनेचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सांगितले. या घटनेवरुन दरोडोखोराचा अंदाज आला असून खात्री होताच त्यांना अटक करण्यात येईल. त्यांच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




























































