पिंपरखेडध्ये दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा; 2 कोटी रुपयांच्या सोन्यासह 31 लाख लांबवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पाच दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर दरोडा टाकून सुमारे 2 कोटी रुपयांचे सोने आणि 31 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरोड्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरूरच्या पश्चिम टोकाला असणाऱ्या पिंपरखेड येथे दुपारी 1.30 वाजता तोंड बांधलेले पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घुसले. यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांना मारहाण करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांच्याकडून लॉकरच्या चाव्या हिसकावल्या. त्यानंतर लॉकरमधील सर्व सुमारे 2 कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपयांची रोकड एका पोत्यात भरली. तसेच बाहेर उभ्या केलेल्या सफेद रंगाच्या चारचाकी वाहनातून चोरटे पसार झाले.

घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. यावेळी या घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ नाकाबंदी करण्यात आली. व्यवस्थापक मोहित चौहान, सागर पानमंद,गणेश खैरे,हरि काळे या कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण केली.शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजची पहाणी करीत चौकशी सुरु केली आहे. शिरूरमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवसा बँकेवर दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.