दरोडेखोरांचा शेतवस्तीवर धुडगूस, मारहाण करीत चाळीस हजारांचा ऐवज लुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाचोड

दरोडेखोरांनी शेतवस्तीवर धुडगूस घालत, शेतात वास्तव्यास असलेल्या एका शेतकऱ्यासह दोन महिलांना बेदम मारहाण करून चाळीस हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना गुरुवारी संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ (ता. पैठण) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वामन साहेबराव पाचे (५०), लंकाबाई वामन पाचे (४५) व त्यांची सासू अंजनाबाई विश्वनाथ कसबे असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

आडूळ खुर्द येथील शेतकरी वामन साहेबराव पाचे यांची संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत आडूळ शिवारात गट नं. ३६ मध्ये शेतजमीन आहे. ते आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. एका खोलीत मुलगा व सून, तर दुसऱ्या खोलीत स्वत: वामन पाचे, पत्नी व सासू असे तिघे मिळून राहतात. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास चार दरोडेखोरांनी शेतवस्तीवर प्रवेश केला. प्रथम दरोडेखोरांनी त्यांचा मुलगा ज्या खोलीत झोपला होता त्या घराची बाहेरून कडी लावून घेतली व नंतर वामन पाचे यांच्या खोलीत घुसले. दरोडेखोरांनी झोपलेल्या वामन पाचे यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची आरडाओरड ऐकूण पत्नी व सासू यांना जाग आली. बाजूच्या खोलीत झोपलेल्या वामन पाचे यांचा मुलगाही जागा झाला. मात्र दरवाजाला बाहेरहून कडी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. वामन पाचे यांना दरोडेखोर मारहाण करीत असताना त्यांनी पत्नी व सासू समोर आल्या असता दरोडेखोरांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत वामन पाचे, त्यांची पत्नी लंकाबाई पाचे व अंजनाबाई हे गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी तिघांना मारहाण करत वामन पाचे यांच्या खिशातील रोख ३ हजार ३००, बॅगेतील १५ हजार व २४ हजार ७०० रुपयांचे महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४० हजारांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.

दरम्यान, दुसऱ्या खोलीत अडकून पडलेल्या कल्याण पाचे याने फोनद्वारे गावात मित्रांना या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर ग्रामस्थांनी तिघा जखमींना तातडीने आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले व पोलिसांना कळवले. घटनेची माहिती कळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकसिंगे, गोरक्ष खरड हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व परिसरात नाकाबंदी केली. तोपर्यंत दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पोलीस उपअधीक्षक जगदीश पांडे, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, विक्रम देशमुख, संजय तांदळे, सय्यद झिय्या, नवनाथ कोल्हे, गणेश गांजळ आदी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात पाहणी केली. अंगुली मुद्रिका व श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. श्वानाने शेतातील घरापासून आडूळ गावापर्यंत माग काढला व तेथेच घुटमळले. या घटनेने शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात कमालीची दहशत पसरली आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, सहायक फौजदार कल्याण राठोड, नरेंद्र अंधारे, नुसरत शेख आदी करीत आहेत.