
सामना ऑनलाईन । विदेश
जगप्रसिद्ध गायक रॉबी विलियम्स याने उडती तबकडी ज्याला UFO म्हटलं जातं , बघितल्याचा दावा केला आहे. काही वैज्ञानिकांनी ‘हंट द स्कीनवॉकर’ नावाचा एक माहितीपट बनवला आहे, या माहितीपटासाठी रॉबी विलियम्स आणि माहितीपटाचा दिग्दर्शक जेरेमी कॉरबेल यांनी पहाटे ३ वाजता एका अत्यंत भयाण भागात परग्रहवासी शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. या निमित्ताने बोलताना रॉबीने मी उडती तबकडी माझ्या डोक्यावरून उडताना पाहिलं आहे असं सांगितलं.
अमेरिकेच्या उताह प्रांतामध्ये नावाजो नावाचं माळरान आहे. या माळरानाचे मालक १९९६ साली ७ फूट विचित्र आकृती बघून जबरदस्त घाबरले होते. यानंतर त्यांनी हे माळरान सोडून तिथून पळ काढला. या मालकांच्या गुरांना अत्यंत पाशवी पद्धतीने मारण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने ती मेली होती, ते पाहिल्यानंतर कोणताही माणूस त्यांना अशा प्रकारे मारू शकणार नाही असा या मालकांचा दावा होता. या माळरानावर मालकांनी त्याआधीही विचित्र आकाराचे प्राणी बघितले होते, हे प्राणी परग्रहवासी किंवा भूतंखेतं असावीत असा माहितीपटाच्या दिग्दर्शकाचा अंदाज आहे. या माळरानात नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी रॉबी आणि दिग्दर्शक कॉरबेल पहाटे तिथे जाऊन बसले होते.




























































