
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या विद्यमान मुख्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानचा संघ सलग दोनवेळा विश्वचषकात उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला आहे. टी-20 क्रिकेटमध्येही टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली होत नाहीये. कधी कधी प्रशिक्षकाने स्वतःला खेळाडूंच्या जागी ठेवून विचार करणे गरजेचे असते. खेळाडूंच्या मनात नेमके काय आहे हे जाणून नव्याने रणनीती आखणे गरजेचे आहे. जर तुम्हाला खेळ कळत असेल तर ही गोष्ट सहज करू शकता. त्यामुळे 2023 विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानी क्रिकेट संघाला बदलाची गरज आहे, अशा शब्दांत टीम इंडियाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि हिंदुस्थानच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेले रॉबिन सिंग यांनी विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
2007 ते 2009 या काळात रॉबिन सिंग टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. याचसोबत हिंदुस्थानी संघाच्या 19 वर्षांखालील संघाला रॉबिन सिंग यांनी यशस्वी मार्गदर्शन केले आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्ससारख्या विजेत्या संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभवही रॉबिन सिंग यांच्या पदरात आहे. रॉबिन सिंग यांच्यासह माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.





























































