चीनच्या रेस्टॉरंटमध्ये रोबोट बनले वेटर; खर्चात कपात

26

सामना ऑनलाईन । शांघाय

चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते त्यांचे पदार्थ सर्व्ह करून बिल देण्यापर्यंतची वेटरची सर्व कामे रोबोट करत आहेत. याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होत आहे. ग्राहकांना येणारे बिल ७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच त्यांना जलद आणि अद्ययावत सेवा मिळत आहे. याआधी रेस्टॉरंटमध्ये दोन जणांसाठी ३०० ते ४०० युआन खर्च येत होता आहे. सध्या रेस्टॉरंटमध्ये वेटरऐवजी रोबोट काम करत असल्याने आता फक्त १०० युआनएवढाच खर्च येत आहे. त्यामुळे आगामी काळात चीनच्या रेस्टॉरंटमध्ये हीच संकल्पना राबवण्याची ई कॉमर्स कंपनी अलिबाबाची योजना आहे. रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्याचा अलिबाबाचा विचार आहे.

सध्या कंपनीने कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी रोबोटची कार्यक्षमता वाढवली आहे. ओव्हनच्या आकाराचे रोबोट वेटरची सर्व कामे करत आहेत. शांघायमध्ये वेटरला दर महिन्याला १० हजार युआन द्यावे लागत होते. तसेच रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या दोन शिफ्ट लावण्यात येत होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत होता. आता रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम रोबोट करत असल्याने पूर्ण दिवस न थकता रोबोट काम करु शकतात. तसेच त्यांच्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नसल्याचे अलिबाबाचे प्रोडक्ट मॅनेजर काओ हैतो यांनी सांगितले.

अलिबाबाने अशाच प्रकारे काम करणारे रोबोट सुपरमार्केटची साखळी असणाऱ्या ‘हेमा’ या त्यांच्या स्टोअर्समध्ये ठेवले आहेत. या स्टोअर्समध्ये अॅपद्वारे ग्राहक वस्तू विकत घेतात आणि रोबोट त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवतात. अलिबाबाने आतापर्यंत चीनच्या १३ शहरात हेमा सुपरमार्केट सुरू केले आहेत. त्यात रोबोटच सर्व कामे करतात. त्यामुळे या स्टोअर्सचा कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी झाला आहे.

आता ड्रोनही देणार रेस्टॉरंटमध्ये सेवा
अलिबाबाची स्पर्धक असणारी जेडी डॉट कॉम ही ई कॉमर्स कंपनी २०२० पर्यंत चीनमध्ये रोबोटद्वारे चालणारे एक हजार रेस्टॉरंट सुरू करणार आहे. तसेच चीनसह इतर देशांमध्ये ड्रोनद्वारे सामान पोहचवणारे नेटवर्क उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यांना या प्रकल्पात यश आल्यास रेस्टॉरंट आणि सुपरमार्केटमध्ये ड्रोनची सेवा ग्राहकांना मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या