
माजी अष्टपैलू कसोटीपटू रॉजर बिन्नी यांची आज हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 36 व्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत बिन्नींसह सचिवपदी जय शहा यांची पुन्हा वर्णी लागली. तसेच उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, कोषाध्यक्षपदी आशीष शेलार आणि आयपीएल चेअरमनपदी अरविंद सिंह धुमल यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
हिंदुस्थानात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टय़ा बनवणार
हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना विदेशातील वेगवान खेळपट्टय़ांवर बेडरपणे खेळता यावे यासाठी देशातच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘जिवंत’ खेळपट्टय़ा उपलब्ध करून देण्याचे आपले पहिले उद्दिष्ट असेल असे सांगून नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी खेळाडूंच्या दुखापतींबरोबर हिंदुस्थानातील खेळपट्टय़ा सुधारण्यावरही आपला जोर असल्याचे प्रतिपादन केले. स्थानिक क्रिकेटपटूंनाही त्यांच्या राज्यात अशा खेळपट्टय़ा उपलब्ध करून देणे हीसुद्धा आमची प्राथमिकता असेल, असे बिन्नी म्हणाले.
हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना वारंवार होत असलेल्या दुखापतींबाबत अध्यक्ष बिन्नी यांनी चिंता व्यक्त केली. जेव्हा खेळाडूंच्या दुखापतींचा प्रश्न समोर येतो तेव्हा त्याची कारणं शोधून त्याच्यावर मार्ग काढणे हीच आमची प्राथमिकता असते. पण यापुढे खेळाडूंच्या दुखापती कशा कमी करता येईल आणि ते लवकरात लवकर कसे फिट होतील, यावर आपले लक्ष राहील. खेळाडूंच्या दुखापतींचा विषय गंभीर आहे. आमच्याकडे बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चांगले डॉक्टर आणि प्रशिक्षक आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही खेळाडूंना वारंवार होत असलेल्या दुखापतींबाबत गांभीर्याने चर्चा करणार असल्याचे नव्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले.
बिन्नी तिसरेच ‘क्रिकेटपटू अध्यक्ष’
रॉजर बिन्नी हे एक क्रिकेटपटू म्हणून बीसीसीआयचे तिसरेच अध्यक्ष होय. याआधी विझियानगरमचे महाराज विझ्झी आणि सौरभ गांगुली हे दोघेच क्रिकेटपटू म्हणून अध्यक्ष झाले आहेत. तसेच ते 36 वे बीसीसीआय अध्यक्ष आहेत. 1983 च्या जगज्जेत्या संघाचे प्रतिनिधित्व करणारे बिन्नी 27 कसोटी सामने खेळले आहेत. बिन्नी यांनी आजवर प्रशिक्षक तसेच निवड समिती सदस्य म्हणूनही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे प्रशासक म्हणूनही काम केले आहे.

























































