नाफेड-CCI खरेदी केंद्रे शेतकऱ्यांच्या हितासाठी की शोषणासाठी? रोहित पवारांचा सरकारला सवाल

नाफेड आणि कापूस महामंडळ (CCI) यांची खरेदी केंद्रे ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत की केवळ शोषणासाठी, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून खरेदी व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, राज्यात एकीकडे खरेदी केंद्रांची मोठी तूट आहे, तर दुसरीकडे उपलब्ध खरेदी केंद्रांवर गेलेल्या सोयाबीन आणि कापसाची खरेदी करण्याऐवजी ती नाकारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा माल घेऊन परत फिरावे लागत असून त्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात आहे.

राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत रोहित पवार यांनी सांगितले की, शासनाने यंदा राज्यात सोयाबीनचे एकूण उत्पादन सुमारे 47 लाख टन असताना खरेदीचे उद्दिष्ट केवळ 18.5 लाख टन इतके तुटपुंजे ठेवले आहे. त्यातही प्रत्यक्षात उद्दिष्टांच्या नावाखाली आतापर्यंत केवळ 8 टक्के म्हणजेच फक्त 1 लाख 47 हजार 900 टन सोयाबीनचीच खरेदी झाली आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांनाही खरेदी प्रक्रियेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. नाफेड आणि CCI यांच्या खरेदी केंद्रांवर नियमांची गुंतागुंत, केंद्रांची अपुरी संख्या आणि खरेदीतील विस्कळीतपणा यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी आणि खरेदी प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, यासाठी आपण सातत्याने सरकारकडे प्रश्न उपस्थित केले, असे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र या सर्व मागण्यांवर सरकारकडून केवळ पोकळ आश्वासनेच दिली गेली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झालेली नाही, अशी टीका त्यांनी केली.

अखेर सरकारला थेट इशारा देत रोहित पवार यांनी मागणी केली आहे की, शासनाने आता तरी नाफेड आणि CCI खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांकडून सहज आणि सुलभ पद्धतीने खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत. शेतकऱ्यांची होणारी ही सततची हेळसांड तात्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.