
पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून, कोयता गँगची दहशत कायम आहे. कोयते घेऊन एकमेकांवर वार करणे, रात्री घराचे दरवाजे वाजवणे, गाड्यांची तोडफोड करणे हे तर आता पुण्यात नित्याचे झाले आहे. यात सराईत गुन्हेगारांसह अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या गँगचे व्हिडीओ सोशल मीडियावरही सातत्याने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवाहर यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली आहे.
पुण्यातल्या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँगचा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यासोबत एक व्हिडीओही शेअर करण्यात आला असून यात दोन गँग एकमेकांवर कोयत्याने वार करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या अधिवेशनामध्येही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी कोयता गँगचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे म्हटले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोयता गँगचा व्हिडीओ समोर आल्याने सरकार याबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होत असल्याचे रोहित पवार यांनी सूचित केले आहे.
पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!… pic.twitter.com/dMZnjFL2IK
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 3, 2025