राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीसारख्या तपास यंत्रणांकडून सातत्याने दिल्या जात असलेल्या त्रासाबद्दल विरोधक संतप्त झाले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तथाकथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक झाली. चव्हाण हे ज्या कंपनीत कर्मचारी होते ती कंपनी मिंधे गटात गेलेल्या संजय म्हशीलकर यांची आहे. कर्मचाऱ्याविरोधात कारवाई होते मग मालकाविरोधात कारवाई का होत नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला असून तो आदित्य ठाकरे यांनी आज बोलून दाखवला.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना आदित्य यांनी म्हटले की, “कंपनीचे मालक मिंधे गटात नेते झाल्याने त्यांना ईडीने बोलावले नाही, मात्र सूरज चव्हाण जे त्या कंपनीतील कर्मचारी आहेत त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. हा न्याय आपल्या देशात चाललाय का पाकिस्तानात चाललाय हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे. अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण हे दोघे त्या कंपनीत कर्मचारी आहे. संजय म्हशीलकर हे मालक आहेत ते मिंधे गटात आहे. त्यांना ईडी अटक करणार आहे की नाही ? का ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे. सूरज चव्हाण, रोहित पवार, राजन साळवी, रवींद्र वायकर, अमोल किर्तीकर या सगळ्यांना हैराण केलं जात आहे आणि सांगितलं जात आहे की भाजपमध्ये किंवा मिंधे गटात या नाहीतर अटक करू. “