कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून 5 ट्रक धान्याची मदत

4066

कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत, निराधार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या जनतेला आमदार रोहित पवार यांच्याकडून सुमारे पाच ट्रक धान्य रविवारी कर्जत येथे पोहोचवण्यात आले. हजारो गरजू लोकांना साधारणतः सात ते आठ दिवस पुरेल एवढे गहू व डाळ असे हे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व त्यांच्या विभागाकडे पोहोचवण्यात आले. गरजूंना प्रशासनाकडून हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे नागरिक अडकून पडले आहेत. त्यात स्थलांतरित, निराधार, मजूर यांचाही समावेश आहे. त्यांना लॉकडाऊनच्या कालावधीत धान्य विकत घेणे व बाहेरून आणणे शक्य होत नाही. त्यामुळे आमदार पवार यांच्या माध्यमातून घरपोच होणाऱ्या या धान्यामुळे हजारो गरजूंना दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनचा कालखंड संपेपर्यंत कर्जत-जामखेडमधील गरजू लोकांची भूक काही दिवस भागणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोहित पवार यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

अनेकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असून याचे कौतुक आहे. मात्र, ही मदत तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली तर गरजूंना धान्याची मदत होईल. प्रत्येकानेआपल्या क्षमतेनुसार गरजुंसाठी धान्य प्रशासनाकडे देण्याचे आवाहन त्यांनी केले. अशा संकटाच्या काळात प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या