
नेहमी अभ्यास करून बोलणाऱ्या नेत्याने अभ्यास न करताच माझ्यावर टीका केल्याचे मला आश्चर्य वाटले. सध्या ते बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे त्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल. फडणवीस यांनी पुन्हा एकदा जीएसटी भरपाई कायदा अभ्यासून कॅलक्युलेशन समजून घ्यावे, असे प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
रोहित पवार यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर टीका केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन कळत नाही त्यांनी अभ्यास करून बोलावे, असे उत्तर दिले होते. त्याविरोधात राोहित पवार यांनी सोशल मीडियात सविस्तर पोस्ट लिहून पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी म्हटले की, मी पुन्हा स्पष्टीकरण देतोय. राजकीय टीकाटिपण्णी होऊ नये म्हणून हे लिहितोय. जनता फडणविसांकडे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून बघते.
रोहित पवार यांनी असेही म्हटले आहे की, आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्राकडून याबाबत भरपाई देण्यास उशीर होत आहे. राज्यासमोर मोठे आर्थिक संकट असताना दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपली चूक सुधारण्याची संधी असते. त्यामुळे त्यांनी जीएसटी भरपाईची मागणी केंद्राकडे लावून धरावी आणि ती मान्य करून घ्यावी.



























































