बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा सणसणीत टोला; म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ पवारमुक्त करणार अशा आशयाचं विधान केलं होतं. या वक्तव्याचा पवार कुटुंबीयांमधील अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं,’ अशा शब्दात रोहित पवारांनी बावनकुळेंना सणसणीत टोला लगावला. पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले असताना त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

वृत्तवाहिनीसोबत बोलताना रोहित पवार यांनी बारामतीकरांवर विश्वास दाखवला. ‘जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करत राहतील. मात्र, आमचा लोकांवर विश्वास आहे. बारामतीचे लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपचं राजकारण सुरू आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते काही बोलत नाहीत,’ असं रोहित पवार म्हणाले.

‘भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तिथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं.’, असा टोला त्यांनी लगावला.

गणपती बाप्पांकडे आपण सत्तेची प्रार्थना केली नसल्याचं ते म्हणाले. राजकारणाची पातळी खाली जात असून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हावं असं मत देखील त्यांनं मांडलं. त्यासाठी आपण प्रार्थना केल्याचंही त्यांनी सांगितलं.