
केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. त्याचा परिणाम देशासह महाराष्ट्रातही दिसत आहे. राज्यातील कांद्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी आंदोलन करत आहे. आता याचा मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून नाशिक आणि नगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात राज्यातले शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशातच केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि नगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. 2,410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना कांदा प्रश्नावरून टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी यासंबंधी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटले आहे की, मुळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या अद्याप तुम्हाला समजलेली दिसत नाही. जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय पायाला. त्यामुळे थोडा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज 1 लाख क्विंटल कांद्याची आवक आहे. केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार म्हणजे केवळ 20 दिवसाची आवक खरेदी करणार आहे. त्यानंतरचं काय? खरेदीसाठी ही मर्यादा का? आमदार पवार यांनी म्हटले आहे की नाफेडमार्फत कांदा खरेदी केला जातो तेव्हा कांद्याचे निर्यातक्षम गुणवत्तेचे निकष असतात. या निकषाने नाफेड खरेदी करणार असेल तर बाजाराच्या सरासरी 2410 रुपये दरानेच खरेदी का? बाजाराच्या उच्चांकी 2800 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी का केली जात नाही? नाफेडकडे पडून असलेला कांदाही केंद्र सरकार विक्रीस काढणार आहे. त्यामुळे भविष्यात अजून भाव कोसळतील, याचा विचार शासनाने केला आहे का?
चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्यापैकी 30 ते 40 टक्के कांदा खराब झाला. चांगला भाव मिळाला असता तर हे नुकसान भरुन काढता आले असते. याचा शासनाने विचार का केला नाही? कांद्याचे भाव कोसळतात तेव्हा सरकार हस्तक्षेप करत नाही आणि आता भाव वाढण्याची केवळ शक्यता निर्माण झाली असताना सरकार हस्तक्षेप करते, हे कुठले धोरण? हा कुठला न्याय? असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

























































