एका कसोटीत दोन शतके अन् 13 षटकार, रोहितचा विक्रमी धमाका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामीवीर म्हणून पहिल्यांदाच फलंदाजीला उतरणार्‍या मुंबईकर रोहित शर्माने विशाखापट्टणम कसोटीत इतिहास रचला आहे. एका कसोटीत दोन शतके, सर्वाधिक षटकार, पहिल्यांदाच सलामीला उतरत केलेल्या सर्वाधिक धावा… अशा एकापेक्षा एक विक्रमांवर मोहोर उमटवणार्‍या रोहित शर्माच्या 127 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर विजय मिळवण्याच्या दिशेने कूच केले आहे. हिंदुस्थानने दुसरा डाव 4 बाद 323 धावा केल्यानंतर डाव सोडला. त्यानंतर विजयासाठी 395 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या दक्षिण आफ्रिकेने 9 षटकांत एक बाद 11 धावा केल्या असून आता उद्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ बळी टिपण्याची गरज आहे. कसोटी मालिकेत आघाडी घेण्यासाठी यजमान संघ सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी आता 384 धावांचे आव्हान असले तरी सध्या ते शक्य दिसत नाही. त्यामुळे पाहुणा संघ पाचव्या दिवशी कसा खेळ करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

169 धावांची शानदार भागीदारी

केशव महाराजने दुसर्‍या डावात मयांक अग्रवालला सात धावांवर झटपट बाद केले. पण त्यानंतर रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा या जोडीने दुसर्‍या विकेटसाठी 169 धावांची शानदार भागीदारी रचली. गेल्या काही डावांमध्ये निराशाजनक कामगिरी करणार्‍या चेतेश्वर पुजाराने दोन षटकार व तेरा चौकारांसह 81 धावांची खेळी साकारली. वेरनॉन फिलॅण्डरने त्याला पायचीत केले. त्यानंतर रोहित शर्माने पाचवे कसोटी शतक झळकवले. या खेळीत त्याने सात सणसणीत षटकार व दहा चौकार चोपून काढले. केशव महाराजने त्याला बाद केले. विराट कोहली (नाबाद 31 धावा) व अजिंक्य रहाणे (नाबाद 27 धावा) यांनी हिंदुस्थानला 323 धावसंख्येपर्यंत नेले.

अश्विनचे सात बळी

दक्षिण आफ्रिकेने आठ बाद 385 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांना पहिल्या डावात 431 धावा करता आल्या. सेनुरॅन मुथुसामी याने नाबाद 33 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने 145 धावा देत सात फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. रवींद्र जाडेजाने पहिल्या डावातील शतकवीर डीन एल्गारला पायचीत केले. त्याला दोनच धावा करता आल्या. आता थ्युनिस डी. ब्रुन व एडन मार्करम खेळत आहेत.

दृष्टिक्षेपात

रोहित शर्माने या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 13 षटकार चोपून काढले. एका कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याआधी पाकिस्तानच्या वासीम अक्रमने 12 षटकार मारत विक्रम केला होता. याआधी हिंदुस्थानसाठी नवज्योत सिद्धूने सर्वाधिक आठ षटकार मारले होते.

सलामीवीर म्हणून पहिल्यांदाच फलंदाजी करताना दोन्ही डावांत शतक झळकावणारा रोहित शर्मा हा पहिलाच फलंदाज ठरलाय. तसेच दोन्ही डावांत मिळून 303 धावा करीत त्याने सर्वाधिक धावा करणाऱयांच्या यादीत पहिल्या स्थानावर धडक मारलीय. याआधी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने 2009 साली न्यूझीलंडविरुद्ध 215 धावा फटकावल्या होत्या.

रोहित शर्माने या कसोटीत 303 धावा आणि मयांक अग्रवालने 222 धावा तडकावल्या आहेत. दोघांनी मिळून या कसोटीत 525 धावा चोपून काढल्याहेत. जागतिक स्तरावर सलामीवीरांनी केलेल्या सर्वाधिक धावांच्या यादीत ही जोडी तिसर्‍या स्थानावर आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी 2003 साली 550 धावा आणि इंग्लंडच्या सलामीवीरांनी 1990 साली 530 धावा तडकावल्या आहेत.

सलामीवीर म्हणून शतक झळकवणारा रोहित शर्मा हा सुनील गावसकर यांच्यानंतरचा हिंदुस्थानचा दुसराच सलामीवीर ठरला आहे. सुनील गावसकरांनी अशी कामगिरी तीन वेळा केली आहे. तसेच एका कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकवणारा तो हिंदुस्थानचा सहावाच फलंदाज ठरलाय. याआधी अजिंक्य रहाणे याने ही कामगिरी केली होती.