दुखापतीमधून बरा होतोय, रोहित शर्माचे कसोटी मालिकेत खेळण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये खेळत असताना रोहित शर्माला दुखापतीला सामोरे जावे लागले. मात्र अखेरच्या काही लढतींमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. तरीही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे व टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. यामुळे निवड समितीवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. रोहित शर्माने यावर शनिवारी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला प्ले ऑफ लढतीआधी खेळीन. तसेच दुखापत गंभीर वाटल्यास प्ले ऑफमध्ये खेळणार नाही असे सांगितले होते.

त्यामुळे मी आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात खेळलो, पण या दुखापतीमधून पूर्णपणे बरा होण्यासाठी आणखी अवधी हवा होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील वन डे व टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. पण इतरांना हे क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचे का वाटले माहीत नाही, असा सवाल करीत त्याने दुखापतीमधून बरा होत असून कसोटी मालिकेत खेळण्याचे संकेतही दिले.

सूर्यकुमार का टाइम आयेगा
मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील खेळाडू सूर्यकुमार यादव गेल्या दोन मोसमात स्थानिक स्पर्धा व आयपीएलमध्ये छान कामगिरी करतोय. पण तरीही ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी त्याची निवड करण्यात आली नाही. यावर रोहित शर्मा म्हणाला, आम्ही दोघे ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. मला त्याच्याजवळ जाऊन काही बोलण्याचे धैर्य होत नव्हते. तो स्वतः माझ्याजवळ आला. तो मला म्हणाला, मी यामधून बाहेर येतोय. टेन्शन घेऊ नकोस. मुंबई इंडियन्सला सामने जिंकून देईन. त्याचे हे बोल ऐकून छान वाटले. तो योग्य मार्गावर चाललाय याची जाणीव झाली. कारण हिंदुस्थानला आगामी काळात बरेच सामने खेळावयाचे आहेत. त्याची वेळही नक्कीच येईल.