न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात रोहित शर्माचे 3 विक्रम!

1785

कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात 163 धावा केल्या. विजयासाठी न्यूझीलंडला 164 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही आणि टीम इंडियाने अखेरच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देत रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. या सामन्यात रोहितने चमक दाखवत 3 विक्रम केले आहेत.

रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याच्या 60 धावा झाल्या असताना पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. मात्र, अर्धशतकी खेळीमुळे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता हा टप्पा पूर्ण करणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत त्यालाही स्थान मिळाले आहे. या यादीत मोहम्द अझरुद्दीन, सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यासोबत रोहितच्या नावाचाही समावेश झाला आहे. या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधले 25 वे अर्धशतक झळकावले. हा विक्रम करत त्याने कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी पोहचला आहे.

रोहितने अर्धशतकी खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. लोकेश राहुलनेही रोहितला चांगली साथ दिली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या चेंडू टोलवत राहुलने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत 45 धावा केल्या. टी-20 पाच सामन्यांच्या मालिकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया 3 वन-डे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईठवॉश देत विक्रम केला आहे. तसेच राहितनेही या अखेरच्या सामन्यात तीन विक्रम केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या