
हिंदुस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये वादळ, वीज, कोल्ड वॉर, भूकंप असे जे नाटय़ रंगवले जात होते, त्यावर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अखेर परफेक्ट यॉर्कर टाकला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात आणि माझ्यात संवादाचा ‘दुष्काळ’ आहे, अशी जी कुजबुज चालली होती, अफवांचे पीक उगवले जात होते, अखेर त्यांची गंभीर यांनी विकेट काढली.
रोहित आणि विराट म्हणजे केवळ वर्ल्ड क्लास क्रिकेटपटूच नाहीत. ते म्हणजे क्रिकेटची शाळाच आहेत, असे म्हणत गंभीरने अफवांचा फास घट्ट ओढून टाकला. ‘ड्रेसिंग रूममध्ये या दोघांचा अनुभव म्हणजे चालतीबोलती ग्रंथसंपदा आहे. संकटात संघाला सरळ वाट दाखवणारे हेच दीपस्तंभ आहेत,’ असे त्यांनी ठासून सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर गंभीरच्या शब्दांत ठसठशीत ठामपणा दिसत होता. हे दोघं आजवर जे करत आले, तेच पुढेही करणार. त्यांची शिदोरी हिंदुस्थानच्या वन डे टीमचा आधारस्तंभ आहे. त्यांचा अनुभवही सोन्याइतकाच बहुमूल्य आहे, असे सांगत गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे संकेत दिले.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडवर गंभीरने कौतुकाची भरपूर रा ंगोळी घातली. वेळ वाट्टेल तशी येते, खेळाडूने संघासाठी तसेच उभे राहायचे असते. ऋतुराजने ते करून दाखवलं. 40 धावांत दोन विकेट पडल्यावर टाकलेलं ते शतक म्हणजे त्याच्या मातीची साक्षच आहे, असे कौतुकही केले.




























































