रोखठोक – ‘कलंक’ शब्दाचे महाभारत!

देवेंद्र फडणवीस व त्यांचे समर्थककलंकशब्दावरून चिडले आहेत. महाराष्ट्रात सध्या जे कलंकित राजकारण सुरू आहे त्याचे सूत्रधार मोदीशहांइतकेच श्री. फडणवीस आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा स्तर इतका खाली घसरलाय की मन दु:खी होते. महाराष्ट्र शिवरायांच्या मार्गाने निघाला होता, तो आता मोदीशहांच्या मार्गाने जाताना दिसतोय. याला जबाबदार कोण?

‘कलंक’ शब्दावरून सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. सर्व प्रकारचे कलंक धुऊन देण्याची योजना सध्या भारतीय जनता पक्ष राबवीत आहे. आमच्यात सामील व्हा व ‘डाग’ धुऊन घ्या अशी ती योजना. तरीही ‘कलंक’ शब्दाचा किती मोठा धसका भाजपने घेतला ते महाराष्ट्राने पाहिले. विदर्भाच्या दौऱ्यात असताना उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले व मेळाव्यात बोलताना श्री. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याचे बोलून गेले. यावर भारतीय जनता पक्षातील फडणवीस समर्थक खवळले. देवेंद्र फडणवीस यांनी ‘कलंक’ उपाधी फार व्यक्तिश:  घेतली. सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण हे राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारे आहे व त्याचे सूत्रसंचालन स्वत: फडणवीस करीत आहेत या अर्थाने श्री. ठाकरे बोलले. ‘कलंक’ ही भाषा बरी नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही असे यावर बोलले गेले, पण श्री. फडणवीस यांनी ज्यांना राजकारणात पोसले व वाढवले असे पडळकर, बावनकुळे, सदाभाऊ खोतांसारखे लोक शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणत्या भाषेचा वापर करीत आहेत? कलंक प्रकरणापूर्वी दोन दिवस आधी सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘सैतान’ असे संबोधले, पण खोत यांची भाषा परंपरा व संस्कृतीला धरून नाही असा सूर फडणवीस किंवा त्यांच्या समर्थकांनी लावला नाही. महाराष्ट्राची संस्कृती, भाषा, परंपरा पूर्णपणे कलंकित करण्याची कामगिरी भारतीय जनता पक्षाने गेल्या अडीच वर्षांपासून सुरू केली व त्याचे भीष्म पितामह नागपुरात बसले आहेत.

सिंहासनपुढचे

मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळेच राजकीय विरोधकांना व्यक्तिगत शत्रू मानून चिखलफेक करीत आहेत. त्यामुळे ‘फडतूस’, ‘कलंक’ अशा शब्दांचा वापर महाराष्ट्रात जोरकसपणे सुरू आहे. शिंदे गट व नव्याने आलेला अजित पवार गट यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे व खासगीत एकमेकांविषयी कोणत्या शब्दांचा वापर होतोय ते वेशभूषा बदलून कोणीतरी जाऊन ऐकायला हवे. पुन्हा दुसऱ्या बाजूला श्री. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे संबंधही बरे नाहीत. त्यांच्यातला संवाद वरवरचा आहे. त्यात आता अजित पवार व त्यांचे चाळीस लोक आले. त्यामुळे शिंदे गटाची हवाच निघाली. “एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाही,” असे अडीच वर्षांपूर्वी सांगणारे अजित पवार हे आता शिंद्यांचे ज्युनिअर सहकारी बनले. अर्थात ही व्यवस्था थोडय़ाच दिवसांनी बदलेल आणि महाराष्ट्रात लवकरच नवा ‘सिंहासन’ चित्रपट पाहायला मिळेल, असे अजित पवार गटाचे लोक उघडपणे बोलतात. एकंदरीत महाराष्ट्राचे राजकारण सगळय़ांनी मिळून कलंकित करण्याचे ठरवलेले दिसते. राजकारणातील कटुता संपायला हवी, पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? विरोधकांवर खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याचे प्रकार याआधीही महाराष्ट्रात झाले व त्यातून यशवंतराव चव्हाणही सुटले नव्हते.

बॅ. अंतुले हे इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रात नेमलेले मुख्यमंत्री होते व ते धीराने घ्यायला तयार नव्हते. 1980 च्या दरम्यान  बॅ. अंतुले यांनी साताऱ्यातील जाहीर सभेत भाषण केले. “छत्रपतींच्या साताऱ्याच्या पवित्र भूमीत यशवंतरावांच्या रूपाने एक कलंक निर्माण झाला आहे,” असे उद्गार मुख्यमंत्री अंतुले यांनी जाहीर सभेत काढले. श्री. यशवंतराव चव्हाण यांनी साताऱ्याला कलंक लावला हे त्यांचे विधान तमाम ‘मराठा’ समाज त्यांच्याविरुद्ध एकत्र येण्यास पुरेसे ठरले. श्री. चव्हाण यांच्यात काही दोष असतील. त्यांनी तडजोडीचे किंवा कुंपणावरचे राजकारण केले, परंतु त्यांना कलंक म्हणणे कुणीही खपवून घेतले नाही, पण श्री. फडणवीस हे काही यशवंतराव नाहीत व महाराष्ट्रासाठी अजून त्यांनी खास काहीही केलेले नाही. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रासाठी ज्या असंख्य गोष्टी केल्या त्या महाराष्ट्र विसरू शकत नाही. नागपूरच्या फडणवीस यांना मोदींनी मुख्यमंत्री केले नसते तर ते कोठे असते? मुख्यमंत्रीपदावर एकनाथ खडसे व त्यानंतर श्री. गडकरी यांचाच हक्क होता. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने सगळेच चित्र बदलले. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून फडणवीस यांनी पक्षातील व बाहेरच्या विरोधकांना जेरबंद केले व महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला सगळय़ात मोठा डाग लावला. राजकारणाचा स्तर त्यांनी खाली आणला. सत्ताधारी आणि विरोधकांतील संवाद संपला व जे विरोधक होते त्यांना त्यांच्यावरील कलंकांसह फडणवीस यांनी स्वीकारले व आता त्यांच्या कलंकित राजकारणावर टीका करणाऱ्यांवर ते डाफरतात. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या संस्थांच्या खात्यावर झाकीर नाईक यांच्याकडून काही कोटी रुपये आले. त्यावर चौकशी कधी? असा प्रश्न विचारला की, फडणवीस चिडतात. चिडणार असाल तर आधी गृह खाते सोडा. राधाकृष्ण विखे व नवाब मलिक यांच्यावरील आरोपांचे स्वरूप एकच असताना त्यातील एक फडणवीस यांच्या मांडीस मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात व दुसरे तुरंगात आहेत. हे चित्र कायदा व समान न्यायाच्या तत्त्वास कलंक लावणारे आहे. महाराष्ट्र राज्यात कोण कलंकित आहे, कोणाला शरम वाटते, कोण बेशरम आहे याची शहानिशा शेवटी जनता करील. अशोभनीय भाषा वापरू नये हे खरे, पण अशोभनीय राजकारण करणाऱ्यांनी हे पथ्य आधी पाळायला हवे. ‘महाराष्ट्र’ या राज्याच्या नावातच साधे राष्ट्र नाही, तर ‘महा’राष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राचे राज्यकर्तेच रोज असभ्य भाषा वापरतात याचीच माझ्यासारख्याला शरम वाटते. भारदस्तपणा, सभ्य भाषा, अनुदारतेचा अभाव ही राज्यकर्त्याची पहिली लक्षणे असायला हवीत. ज्यांच्यापाशी इतरांचे फोडलेले पाशवी बहुमत आहे, त्यांच्याजवळ ती अधिक हवी, पण महाराष्ट्र आज शिवरायांच्या नव्हे, तर मोदी-शहांच्या पावलावर पाऊल ठेवून ओढला जात आहे. महाराष्ट्राने क्षुद्रता, खंडीभर मिजास आणि अरेरावीची भाषा यांची कधी गय केली नाही. हा महाराष्ट्राचा गुण आहे.

भाग्यच जास्त

श्री. फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर असण्याचे कारण नाही. ते गृहस्थ चांगले. पण राजकारणात कर्तृत्वापेक्षा भाग्याने त्यांना सर्व मिळाले, पण महाराष्ट्रासाठी त्यांनी काय केले? हा प्रश्न आहेच. महाराष्ट्रातील अनेक उद्योग त्यांच्या डोळय़ांसमोर गुजरातेत खेचून नेले. महाराष्ट्राच्या शिखरावरील सोन्याचे कळस तुमच्या डोळय़ांसमोर कापून नेले. कोरोना काळात महाराष्ट्राला गरज असताना भाजप आमदार-खासदारांच्या मानधनाचा निधी फडणवीस यांनी बिगर सरकारी खासगी स्वरूपाच्या ‘पीएम केअर फंडा’कडे वळवला. महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रात राहू नये असे ज्यांना वाटते, त्यांना महाराष्ट्राचे स्वाभिमानी कसे मानायचे?

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकीय शेरेबाजी चालते. राज्यप्राप्तीसाठी औरंगजेब आपल्या जन्मदात्या पित्यास कैदेत ठेवू शकला आणि सख्ख्या भावाचा खूनही केला. महाराष्ट्राने शिवरायांचा मार्ग सोडला. तो वेगळय़ाच मार्गाने निघाला. हा मार्ग दिल्लीतील ‘शाहय़ांचा’ व औरंगजेबाचा असू नये इतकेच!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]