रोखठोक – बाळासाहेब आज हवे होते!

rokhthok

बाळासाहेब ठाकरे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व. आज ते हवेच होते. पंजाबच्या शेतकऱ्य़ांची साठ दिवस टोलवाटोलवी सुरू आहे. ते पाहिल्यावर अनेकांना वाटलं सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते. त्यांच्या आठवणीने आजही महाराष्ट्र आणि देश रोमांचित होऊन उठतो. कारण देश पेटविण्याची किमया त्यांनी वारंवार केली. आज असे नेतृत्व दिसत नाही.

बाळासाहेब ठाकरे! हिंदुस्थानच्या राजकारणातील एक वादळी आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व. काल 23 जानेवारीस बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा केला. कुलाबा परिसरातील एका ट्रॅफिक आयलॅण्डवर बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते केले. मुख्यमंत्री कोण, तर उद्धव ठाकरे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शरद पवार. महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे व तो ‘ठाकरे’ आहे. कुलाब्यातील काही नतद्रष्ट लोकांनी बाळासाहेबांच्या पुतळ्यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा त्यांनी आधार घेतला. केरळमधील एका ट्रॅफिक जंक्शनवर तेथील एका नेत्याचा पुतळा बसवायचा होता. कोर्टाने तो रोखला. ट्रॅफिक जंक्शनवर यापुढे पुतळे उभारता येणार नाहीत हा तो निर्णय. कारण काही असेल, पण बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण थाटात पार पडलेच आहे. जिवंतपणी कोणत्याही कोर्टाची पर्वा बाळासाहेबांनी केली नाही. बाळासाहेब त्यांच्या खुर्चीवर बसले की, कोर्ट सुरू. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे न्याय हे कित्येक वर्षे महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवले आहे. 20 तारखेला मी कारवारला होतो. ज्या बेळगाव-कारवारसाठी महाराष्ट्र आजही लढत आहे, तोच हा भाग. प्रवासात सोबत श्री. शरद पवार आणि ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे होते. बेळगावचा लढा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी निघाल्या. बेळगावसह सीमा भागासाठी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष. बाळासाहेबांनी तीन महिन्यांचा तुरुंगवास याकारणी भोगला. 1 जून 1986 पासून कर्नाटक सरकारने सीमा भागात कन्नडची सक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात वातावरण तापले. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची कोल्हापुरात बैठक झाली. एस. एम. जोशी, शरद पवार, एन. डी. पाटील, बाळासाहेब ठाकरे असे नेते त्या बैठकीत होते. प्रमुख नेत्यांनी बेळगावात जाऊन आंदोलन करावे असे ठरले. या आंदोलनाची सुरुवात बाळासाहेबांनी करावी यावर खल झाला, पण बाळासाहेबांनी जाऊ नये असे ठरले. एकतर कन्नड पोलिसांचा बाळासाहेबांवर राग होता. पोलीस बाळासाहेबांशी नीट वागणार नाहीत, काही वेडेवाकडे घडले तर महाराष्ट्र पेटेल. त्यामुळे शरद पवार आधी गेले. कन्नड पोलिसांनी त्यांना चोप दिला व अटक केली. शिवसेनेतर्फे बेळगावात घुसण्यासाठी बाळासाहेबांनी मुंबईचे महापौर असलेल्या छगन भुजबळ यांची निवड केली. भुजबळ इक्बाल शेख नावाने वेषांतर करून बेळगावातील राणी चेनम्मा चौकात गेले. तेथे कानडी पोलिसांनी त्यांना निर्घृणपणे मारले. बराच काळ ते तुरुंगात होते. हे सर्व प्रसंग कारवारच्या भूमीत पुन्हा आठवले. बाळासाहेबांना हात लागला तर महाराष्ट्र पेटेल हा धाक तेव्हाही होता. त्याचे नंतर दहशतीत रूपांतर झाले. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ‘देश पेटेल’ इथपर्यंत विषय गेला. ठाकरे नावाचीच ही जादू होती.

संघटनेचे बळ

पिढी बदलली तरी बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव जनमानसावर कायम आहेच. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे उभे राहतील, त्यांच्या नावाने शासकीय इमारती व योजना निर्माण होतील, त्यांच्या स्मारकांची पायाभरणी होत राहील, त्यांच्या नावाने यापुढेही मते मागितली जातील, पण या सगळ्याची गरज बाळासाहेबांना कधीच भासली नाही. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे राहिले नसते म्हणून रामाचे नाव, श्रद्धा लोक विसरले असते काय? खरे राममंदिर बाहेर आहे, ते लोकांच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे तेच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पददलित बांधव का मानतात? बाबासाहेबांनी मुक्या मेंढरांची माणसे केली. बाळासाहेबांनी सामान्यांना मानसन्मान मिळवून दिला, सत्तापदे देऊन मोठे केले. बाळासाहेबांमुळे प्रत्येक मराठी माणसाला ‘‘मी छत्रपती शिवरायांचा वंशज आहे’’ असा आत्मविश्वास आला. बाळासाहेबांनी लढे निर्माण केले. मराठी माणसाला पानिपतातून शौर्य गाजवायला शिकवले. हातात कोणती सत्ता नाही, पद नाही, पाठीशी भांडवल नाही. फक्त संघटनेच्या बळावर बाळासाहेबांनी मस्तवाल राजकारणी, भांडवलदार, मुंबईचे ‘भाई’ लोक यांना आपल्या चरणाशी आणले होते. आज मोदी-शहांची आरती गाणारे मुंबईतील गुजराती बांधव 1992 नंतर बाळासाहेबांचे भक्त झाले. ‘‘बाळासाहेब होते म्हणून आमच्या लेकी-सुनांची इज्जत वाचली’’ असा डंका हे व्यापारी लोक जगभर पिटत होते. कारण बाळासाहेबांचे हिंदुत्व फक्त पोथीपुराण, शेंडी-जानव्याचे नव्हते. ते अंगावर येणाऱ्य़ाचा कोथळा काढणाऱ्य़ा तळपत्या तलवारीचे होते. बाळासाहेबांनी शूरवीर घडवले व शूरांचे नेतृत्व केले. त्यामुळे पाठीत वार करण्याची त्यांना कधी गरजच पडली नाही. इतका खुल्लमखुल्ला, दिलदार मनाचा नेता देशाच्या इतिहासात झाला नसेल.

ते आज हवेत!

बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. ‘हम करे सो कायदा’ ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते. नोटाबंदी, लॉक डाऊनसारख्या संकटांनी हतबल झालेल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी बाळासाहेब हवे होते. कश्मीरातील अतिरेक संपलेला नाही, पण ‘‘माझ्या शिवसैनिकांच्या हाती एके-47 द्या, कश्मीरातील दहशतवाद संपवून दाखवतो’’ असे ठणकावणारे बाळासाहेब हवे होते. ‘‘अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही’’ अशी ‘गिधड’ धमकी देताच केंद्राचे सरकार गर्भगळित झाले, पण मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राटाने उलटखाती त्या धमकीच्या ठिकऱ्य़ा उडवत गर्जना केली, ‘‘अमरनाथ यात्रा होणारच! एका जरी अमरनाथ यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तर याद राखा. हजला जाणारे एकही विमान उडू देणार नाही.’’ बस्स! अतिरेक्यांचा मामला थंड. आज ते बाळासाहेब हवे आहेत असे दिल्लीच्या सीमेवर 50 दिवसांपासून थंडीवाऱ्य़ात लढा देणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांनाही वाटत असेल. शेतकऱ्य़ांच्या बाजूने बाळासाहेबांनी एकच गर्जना करून अहंकारी सरकारला सळो की पळो करून सोडले असते. कर्नाटकातून 20 तारखेच्या संध्याकाळी गोव्यात पोहोचलो. संध्याकाळी हॉटेलच्या मागच्या समुद्रकिनारी चालत होतो. समुद्रस्नान करून एक तरुण व त्याची साधारण चार वर्षांची मुलगी बाहेर आली. मला बघून तो तरुण समोर आला.

‘‘नमस्ते, आप संजय राऊत है? आपको प्रणाम!’’

‘‘क्या नाम हैं आपका?’’ मी.

‘‘गुप्ता. मैं दिल्ली से हूं।’’

त्यानंतर त्याने त्याच्या चार वर्षांच्या लहान मुलीस सांगितले, ‘‘बेटा, अंकल को प्रणाम करो। दि ग्रेट बालासाहब ठाकरे के साथ उन्होंने काम किया है।’’ रोमांचित होणे म्हणजे काय हे मी त्याक्षणी अनुभवले.

बाळासाहेबांच्या आठवणीने आजही महाराष्ट्र रोमांचित होतोय, यापुढेही होत राहील.

हे असे बाळासाहेब, आज हवे होते!

@rautsanjay61

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या