रोखठोक : धुरळा, चिखलफेक आणि लोकशाही

73
rahul-gandhi-modi

rokhthokसहाव्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. ‘मोदी विरुद्ध गांधी’ अशी ही आता सरळ लढाई झाली आहे. ‘‘लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य जपायचे कोणी?’’ असा प्रश्न पडावा इतका धुरळा उडाला आहे. चिखलफेकीला तर सीमा नाही. त्यातून निवडणूक आयोगही सुटला नाही. हे चित्र देशासाठी बरे नाही.

काँग्रेसचे नेते राहुल व त्यांच्या प्रिय भगिनी प्रियंका यांच्या संपूर्ण पाठिंब्याने नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर विराजमान होत आहेत. सहाव्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. आतापर्यंत 425 जागांवर मतदान झाले. मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी व प्रियंका निस्तेज ठरल्या. देश सुरक्षित हाती असावा म्हणून लोकांनी पुन्हा मोठय़ा प्रमाणात मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले. एका मुलाखतीत राहुल गांधी यांनी सांगितले,‘‘नरेंद्र मोदी यांचे सगळ्यात मोठे भांडवल म्हणजे त्यांची प्रतिमा (‘इमेज’ हा शब्दप्रयोग त्यांनी केला.). या ‘इमेज’वरच मी हल्ला करीन.’’ गांधी यांचा सगळा जोर ‘‘चौकीदार चोर है’’ या घोषणेवर होता, पण संपूर्ण निवडणुकीत राफेलचा विषय उडालाच नाही. गांधी यांनी जे मुद्दे उचलले ते फारसे चालले नाहीत. उत्तर प्रदेशात वाराणसीमधून प्रियंका गांधी यांनी माघार घेतली. एका उघडय़ा जीपवर बसून प्रियंका गांधी प्रचारास निघतात व रस्त्यावर उतरून लहान मुलांशी खेळतात. एकदा त्या गारुडय़ाशी व त्याच्या टोपलीतील सापाशी खेळताना दिसल्या तेव्हा जनतेने मनाशी पक्के केले. देश व लोकशाही म्हणजे मुलांचा खेळ नाही. गांधी भाऊ-बहिणीला वयाबरोबर आचार, विचारानेही मोठे व्हावे लागेल.

पंतप्रधानांची आचारसंहिता
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारी झाल्या. या पाचही तक्रारींतून निवडणूक आयोगाने मोदी यांना क्लीन चिट दिली हे विरोधकांना रुचले नाही. हिंदुस्थानची लोकशाही आजही बऱयाच अंशी अडाणी आहे याचे पुरावे अनेकदा या निवडणुकीत दिसले. स्मृती इराणी या केंद्रीय मंत्री. त्यांच्या डिग्रीवरून वाद झाला. पाच वर्षांपूर्वी उमेदवारी अर्जात पदवीधर असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या निवडणुकीत पदवीधर नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावरून वाद झाला, पण स्मृती इराणी यांनी मंत्री म्हणून त्यांची खाती उत्तम सांभाळली.संसदेत त्यांनी जोरदार काम केले व अनुभव कागदी पदव्यांवर मात करतो हे दाखवून दिले. मोदी हे शिक्षणात कमी, पण त्यांनी राज्य व देश उत्तम चालवला आणि जगात नेते म्हणून ते वावरले. ते अनेक उच्चशिक्षितांना जमले नाही. भाजपचे दुसरे महत्त्वाचे उमेदवार रवी किशन हे गोरखपूरमधून लढत आहेत. पाच वर्षांत त्यांचे वय सात वर्षांनी वाढले आणि 2014 पेक्षा शैक्षणिक अर्हता कमी झाली. 2014 साली रवी किशन काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा शपथपत्रात त्यांचे वय 44 होते. मुंबईच्या रिझवी कॉलेजातून 1992-93 साली बी.कॉम. झाल्याचे त्यांनी लिहिले होते. आता गोरखपूर येथून ते निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी दिलेल्या शपथपत्रात त्यांचे वय 51 वर्षे आणि याच कॉलेजातून 1990 साली इंटरमीजिएट केल्याचे दाखवले आहे. आता सत्य काय ते उमेदवारच सांगू शकतील. मुळात शिक्षणाचा कॉलम हवाच कशाला, असा प्रश्न पडतो. पंडित नेहरू परदेशातून शिकून आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने देश घडवला, पण कमी शिकलेल्या मोदी यांनीही देशाचे चित्र त्यांच्या पद्धतीने बदलविण्याचा प्रयत्न केला. शिकणे व शहाणा असणे यात नेहमीच तफावत राहिली आणि ती आमच्या लोकशाहीत व निवडणुकीत दिसली. त्यावर चर्चा करणे आता निरर्थक आहे. समाज माध्यमांवर या विषयाची कशी गंमत उडवली जाते, पहा…

12 वी तक पढ़नवालों के रिझल्ट आज आ गए है।
10 वी तक पढ़नेवालों के रिझल्ट 5 मई तक आएंगे।
और कुछ ना पढ़नेवालों के रिझल्ट 23 मई को आएंगे।
आमच्या निवडणुकांचे हे खरे चित्र आहे.

संघर्ष का?
कोणत्याही निवडणुकीत राजकारणी आणि निवडणूक आयोगाचा संघर्ष होतच असतो. आताही निवडणूक आयोगावर आरोप सुरूच आहेत. अशावेळी हिंदुस्थानचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शेषन यांनी आदर्श आचारसंहितेची प्रामाणिक अंमलबजावणी केली. सगळ्याच उमेदवारांना समान संधी व समान न्यायाचे तत्त्व लागले. हे असे त्याआधी व त्यानंतर कधीच घडले नाही. एका मुलाखतीत शेषन यांनी सांगितले होते, ‘‘आय ईट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट’’ (म्हणजे ‘‘मी रोज सकाळच्या नाश्त्याला राजकारण्यांना पचवतो’’). त्यांचे ते विधान सगळ्यांनाच घाम फोडणारे होते. शेषन येईपर्यंत आयोग म्हणजे दात काढलेला नाग होता. शेषन यांनी घटनेतील कलम 324 ने दिलेल्या प्रचंड अधिकारांची जाणीव करून दिली. या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयातही कुणी आव्हान देऊ शकले नाही, पण शेषन एकच झाले. म्हणून शेषनसारखा राष्ट्रपती देशाला हवा असे बाळासाहेब ठाकरे म्हणत होते. निवडणूक आयोग आताही काम करतो आहे. गेल्या दोन निवडणुकांत पैशांचा, काळ्या पैशांचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला. 5 मेपर्यंत रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ असे मिळून 3,511 कोटी रुपये जप्त केले. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. निवडणूक काळात इतकी मोठी रक्कम जप्त होणे चांगले संकेत देत नाहीत. तरीही निवडणूक आयोगास मिळत गेलेल्या गोपनीय माहितीमुळे ही कारवाई झाली. विधानसभा आणि लोकसभेसाठी खर्चाच्या मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिल्या आहेत. त्या मर्यादा आज कोणीच पाळायला तयार नाहीत. तरीही सगळ्यांना वाटते, निवडणूक आयोगाने पक्षपाती असू नये. राजकीय पक्ष, उमेदवार यांनी मर्यादा पालन केल्याशिवाय हे शक्य नाही. कोणाचेही सरकार आले तरी निवडणूक आयोगाला कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे थांबायला हवे.

पावित्र्य कोणी राखायचे?
गांधी असोत की मोदी, प्रत्येकाने निवडणुका आणि लोकशाहीचे पावित्र्य जपले पाहिजे. देश खड्ड्यात जावा आणि खड्डय़ात गेलेल्या देशावर राज्य करावे असे कुणाला वाटेल? 2014 साली संसदेच्या पायरीवर नतमस्तक होऊन मोदी यांनी आत प्रवेश केला. पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली तेव्हा ‘सेंट्रल हॉल’मध्ये ते भावुक झाले. देशाच्या निवडणुका हा अनेक वर्षे भावनेचा खेळ बनला आहे. तो विकासाचा मुद्दा बनावा असे आमच्या नेत्यांना वाटेल तो लोकशाहीसाठी सुवर्णदिन. कौरव-पांडवांची लढाई व्हावी तसे हे लोकसभेचे युद्ध सुरू आहे. महाभारतातील युद्ध संपले तेव्हा कौरवही उरले नाहीत व पांडवही उरले नाहीत. सोनिया गांधी या राजीव गांधींच्या प्रेमात पडल्या. त्यांनी लग्न करायचे ठरवले तेव्हा ‘इंडिया’विषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. तेव्हा ‘गुगल’ नव्हते. ‘गारुडी व सापांचा देश म्हणजे इंडिया’ एवढीच त्यांना माहिती होती. देश आता अंतराळात पोहोचला, पण साप-गारुडीदेखील येथे आहेतच. प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात जाऊन सापाशी खेळताना दिसल्या. ‘‘सोनिया गांधींची मुले अजूनही साप-गारुड्यांशीच खेळत आहेत. त्यांच्या हाती देश देणार काय?’’ असा प्रश्न श्री. मोदी यांनी विचारला.

कोणता गारुडी पुंगी वाजवतोय व जनता कोणत्या गारुड्याच्या मागे जातेय ते 23 मे रोजी समजेल.

घोडा मैदान लांब नाही!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या