रोखठोक – भाजप खरंच जिंकला काय?

पाच राज्यांपैकी तीन राज्यांत मोदीकृत भाजपचा विजय झाला. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांचा हा कल असल्याचे सांगितले गेले. ते तितकेसे खरे नाही. इंडिया आघाडीचे गणित महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, कर्नाटक या राज्यांवर टिकून आहे. शिवाय दक्षिणेतील राज्ये भाजपच्या सोबत नाहीत. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान मिळून 65 जागांवर भाजपचे ‘हॅटट्रिक’चे स्वप्न आहे काय? पराभूत झालेल्या काँग्रेसला 40 टक्के मतदान झाले व भाजपपेक्षा 10 लाख मते जास्तच पडली. हे चित्र आशादायी आहे!

पाचपैकी तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप कार्यालयात विजय उत्सव साजरा करण्यासाठी गेले. तेथून त्यांनी देशभरातील जनतेचे आभार मानले. मोदींचे भाषण सुरू असताना समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या, “साहेब, आधी ईव्हीएमचे आभार माना. मग जनतेचे!” मध्य प्रदेशातील निकालानंतर जनतेची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. मध्य प्रदेशबरोबर राजस्थान, छत्तीसगढ भाजपने जिंकले. तेलंगणात के. सी. चंद्रशेखर राव यांची सद्दी शेवटी काँग्रेसने संपवली. श्री. मोदी व शहा यांनाही ते जमले नाही. पाच राज्यांच्या निकालाचे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होतील हा पहिला प्रश्न आणि महाराष्ट्राचे 2024 चे चित्र या पार्श्वभूमीवर कसे असेल हा दुसरा प्रश्न.

चमत्काराचे जनक

मोदी यांच्यामुळे विजयाचा चमत्कार तीन राज्यांत घडला, पण हाच चमत्कार दक्षिणेतील तेलंगणात ते घडवू शकले नाहीत. मोदी व शहा यांनी तेलंगणा ढवळून काढले, पण जादू चालली नाही. तेलंगणात भाजप स्पर्धेत नसल्याने मोदी-शहांनी भाजपचे मतदान भारत राष्ट्र समितीस वळवले. तरीही मुख्यमंत्री के. सी. आर. पराभूत झाले. राजस्थान, छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे राज्य होते. तेथे ‘अँटी इनकम्बन्सी’मुळे काँग्रेस पक्ष हरला असे सांगणे योग्य नाही. भाजपच्या राज्यात त्याच ‘अँटी इनकम्बन्सी’चा फटका कसा बसत नाही, याचा विचार व्हायला हवा. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना अपमानित करण्याची एकही संधी भाजप हायकमांडने सोडली नाही. या निवडणुकांत शिवराजसिंह यांना निपटवून टाकायचे हा चंग बांधूनच मोदी व त्यांची संपूर्ण टीम उतरली. मध्य प्रदेशात मोदी-शहांचे मुख्य लक्ष्य काँग्रेसचा पराभव करणे हे नव्हते, तर शिवराजसिंह यांना निपटवणे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर त्यांची दावेदारी राहू नये हे त्यांचे लक्ष्य होते व त्यासाठी मध्य प्रदेशात कधी मिळाला नाही इतका आमदारांचा आकडा विजयी करणे हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिल्लीचे हायकमांड सांगेल तोच मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री होईल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर दिल्लीत अस्थिर चित्र निर्माण झाले तर शिवराजसिंह चौहान, नितीन गडकरींसारख्या नेत्यांना परिस्थितीचा फायदा घेता येऊ नये यासाठी सगळय़ांचे पंख आधीच कापून ठेवण्याचा हा प्रयत्न. अर्थात शिवराजसिंह हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हते. तरीही शिवराजसिंह यांनी हार मानली नाही व मध्य प्रदेशात लडखडणाऱ्या भाजपला विजयाच्या शिखरावर नेले. भाजपच्या यशात काँग्रेसच्या कमलनाथांचे मोठे योगदान आहे. मध्य प्रदेशातील पत्रकार सांगत होते, “हे सरदार सकाळी 10 वाजता प्रचारासाठी बाहेर पडत होते. दुपारी एक वाजता त्यांच्या छिंदवाडय़ातच एखादी सभा करून ते घरी परत येत असत. त्याच वेळी शिवराजसिंह एका दिवसात 15-15 प्रचार सभा करून वातावरणात जोश निर्माण करीत होते.” मध्य प्रदेशातील काँग्रेसची सूत्रे कमलनाथ यांनी स्वत:च्या हातात ठेवली. ते स्वत:ही बाहेर पडत नव्हते आणि दुसऱ्या नेत्यांनाही प्रोत्साहन देत नव्हते. मध्य प्रदेशात कमलनाथ यांना निवडणूक खरेच लढायची होती की नाही? मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत पहिली सभा भोपाळ येथे घ्यायचे ठरवले, पण कमलनाथ यांनी भोपाळ येथे ‘इंडिया’ची सभा होऊ दिली नाही. ‘इंडिया’ने काही टी.व्ही. वाहिन्यांच्या अँकर्सवर बहिष्कार टाकला, पण निवडणुकीदरम्यान कमलनाथ त्याच ‘अँकर्स’ना बोलावून खास मुलाखती देत होते. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचे काही जिल्हय़ात चांगले वजन आहे. त्यांचे दोन आमदार निवडून आले होते, पण कमलनाथ यांनी जागावाटपात अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. ‘कोण अखिलेश?’ असा त्यांनी प्रश्न केला व वातावरण बिघडवले. हे सर्व ठरवून झाले असेल तर काँग्रेसला राज्यातील अशा सरदारांचा वेळीच बंदोबस्त करावा लागेल. मोदी व भाजपच्या सोयीचे राजकारण करणारे लोक गांधींच्या अवतीभवती असतील तर 2024 ला अधिक धोका निर्माण होईल. राजस्थानात अशोक गेहलोत यांनी शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणे झुंज दिली. छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल यांचे सरकार चांगले काम करीत होते, तरीही ही राज्ये काँग्रेसने गमावली.

मोदींची दंतकथा

मोदींचा पराभव करणे काँग्रेसला शक्य नाही ही दंतकथा आहे. छत्तीसगढ, राजस्थान व मध्य प्रदेशातही मोदीकृत भाजपचा पराभव काँग्रेसने याआधी केला आहे व यावेळी तेलंगणात काँग्रेसने मोदी यांची डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे तीन राज्यांतील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजप व त्यांचे मांडलिक पक्ष दिवाळी साजरी करीत आहेत तो आनंद औटघटकेचा ठरेल. तीन राज्यांतील विजयानंतर मोदी म्हणाले, “आम्ही अहंकाराचा पराभव केला.” अहंकार काय ते गेल्या वर्षभरात भाजपने महाराष्ट्रात जे केले त्यात स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय कोणताही नेता व पक्ष टिकता कामा नये हा भाजपचा अहंकार सध्या सोसाटय़ाच्या वाऱयाप्रमाणे घोंघावत आहे. तेलंगणाचे निकाल लागत असताना राज्याचे पोलीसप्रमुख अंजनी कुमार हे राज्य काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांना भेटले. हा आचारसंहितेचा भंग मानून केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित केले. भाजप नेत्यांकडून प्रचारात आचारसंहितेचा रोज भंग होत असताना हाच निवडणूक आयोग काहीच करीत नव्हता. ‘आमचे सरकार आले तर अयोध्येत रामलल्लाचे मोफत दर्शन घडवू’ असे सांगणे हा आचारसंहितेचा सरळ भंग असताना त्या पारीची साधी दखल न घेणारा निवडणूक आयोग अचानक जागा होतो व तेलंगणाच्या पोलीसप्रमुखांना निलंबित करतो. यामागे अदृश्य अहंकारी शक्तीचाच हात आहे.

नवे काय घडले?

तीन राज्यांच्या निकालाने नवे काय घडले? छत्तीसगढ काँग्रेसकडून गेले, पण तेलंगणा आले. मध्य प्रदेश भाजपकडेच होते. राजस्थानने पाच वर्षांनंतर फेरबदलाची परंपरा कायम राखली. त्यामुळे नवे काय घडले? मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये भाजपने यश मिळवले, पण या राज्यांत पोस्टाचे मतदान बालट पेपरद्वारे झाले. बालट पेपरद्वारे झालेल्या मतदानाचे आकडे आश्चर्यकारक आहेत. मध्य प्रदेशात 199 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे, पण ईव्हीएम मशीन उघडल्यावर कल भाजपकडे वळत गेला, याची नोंद घ्यावीच लागेल. तीन राज्यांच्या विजयाने भाजप जमिनीवरून पाच फूट वर चालताना दिसत आहे. या अहंकाराचा फुगा 2024 साली फुटेल. तीन राज्यांत विजयाचा डंका पिटणाऱया भाजपास एकूण मते मिळाली 4,81,33,463. पण निवडणुकीत मात खाल्लेल्या काँग्रेसला 4,90,77,907 मते मिळाली. विजयी भाजपच्या तुलनेत काँग्रेसने 9 लाख मते जास्त मिळवली. तरीही चारही दिशांना असा प्रचार सुरू आहे, जणू भाजपने काँग्रेसला 20 फूट खाली जमिनीत गाडले व आता काँग्रेस कधीच वर उठणार नाही. जागा भाजपने जास्त जिंकल्या तर मते काँग्रेसला जास्त पडली. राजस्थानात भाजपास 41.7 टक्के मते, तर काँग्रेसला 39.6 टक्के. जेमतेम दोन टक्क्यांचे अंतर आहे. छत्तीसगढमध्ये भाजप 46.3 टक्के, तर काँग्रेस 42.2 टक्के. येथे 4 टक्क्यांचे अंतर. फक्त मध्य प्रदेशात 8 टक्क्यांचे अंतर आहे. भाजप येथे 48.6 टक्के तर काँग्रेस 40 टक्क्यांवर घसरली. तीन राज्यांत पराभूत होऊनही काँग्रेसकडे 40 टक्के मते आहेत. राज्यात लहान पक्षांना डावलले नसते तर काँग्रेस 45 टक्क्यांवर गेली असती. तेलंगणात काँग्रेसला 39.4 टक्के (92 लाख) मते तर भाजपास 13.9 टक्के मते. म्हणजे 32 लाख मतदान झाले. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे गणित मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांवर अवलंबून आहे. तर ‘इंडिया आघाडी’चे गणित महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल, बिहारवर टिकून आहे. पुन्हा केरळ, तामीळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश ही राज्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे तीन राज्यांमधील विजय म्हणजे 2024 च्या ‘हाटट्रिक’ची तयारी नक्कीच नाही.

‘इंडिया’ आघाडीस मरगळ झटकून पुढचे दमदार पाऊल टाकायला लावणारे हे निकाल आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसने जिंकले असते तर 2024 च्या निवडणुकीआधी मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बाम्ब टाकला असता. एखादे नवे ‘पुलवामा’ घडताना उघडय़ा डोळय़ाने पाहिले असते. कश्मीरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात व ’देश खतरे में’च्या गर्जना करून ‘देशभक्ती’साठी मते मागितली असती. जवानांच्या शवपेटय़ांना वंदन करण्याची छायाचित्रे फिरवून आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणी नाही हे ठसवण्याचा प्रयत्न झाला असता. प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतात त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीआधी दंगली व मोठय़ा नरसंहाराचा बेत तडीस नेला असता. आशा आहे, तीन राज्यांतील विजयांमुळे हे बेत तूर्त रहीत केले जातील! पण तीन राज्यांमधील विजय म्हणजे 2024 च्या विजयाचा शंखनाद या भ्रमात जे आहेत त्यांनी त्याच भ्रमात राहणे देशहिताचे आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]