रोखठोक : सेक्युलर शब्दाचा कीस काढणाऱ्यांसाठी काही मुद्दे!

7499

rokhthokमहाराष्ट्राचे नवे सरकार सरळ पाच वर्षे टिकेल. सरकार लगेच कोसळेल असे शाप भाजप देत आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या विरोधात आहे. ही सद्भावना नाही. राज्य समान न्यायाच्या तत्त्वावर चालते. ‘घटना’ वेगळे काय सांगते?

डिसेंबर उजाडण्याआधी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल हे आता नक्की झाले आहे. राज्याच्या राजकारणाची सर्व सूत्रे पुन्हा दिल्लीत सरकली, कारण सोनिया गांधी दिल्लीत आहेत व काँग्रेसचे मुख्यालय दिल्लीत आहे. त्यामुळे सर्व निर्णयांसाठी काँग्रेसवाले दिल्लीच्या दिशेने पाहतात. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचे निर्णय आपापल्या राज्यातच होतात असे नाही. भाजपचे निर्णय केंद्रही दिल्लीतच आहे व हायकमांडशी सल्लामसलत करण्यासाठी राज्याराज्याचे भाजप नेते दिल्लीतच येत आहेत. भाषावार प्रांतरचना निर्माण झाली, पण राजकीय निर्णयांच्या बाबतीत नेते दिल्लीवरच अवलंबून आहेत. शिवसेनेस ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही हा निर्णय भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी घेतला व महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर जायचे की नाही हा निर्णय काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी घेतला. दिल्ली हे एक परावलंबी शहर आहे. दिल्लीला स्वतःची हवा नाही. स्वतःचे पाणी नाही. स्वतःची संस्कृती नाही. माणसे नाहीत, पण दिल्लीने ठरवले तेच घडत असते. महाराष्ट्रात काय करायचे? यावर किमान पंचवीस दिवस दिल्लीत चर्चा झाल्या. दिल्लीत समुद्र नाही. त्यामुळे समुद्रमंथनातून मोती निघाले असे म्हणता येणार नाही; पण एक सरकार मात्र निर्माण होत आहे.

वेळ का?
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी इतका वेळ का लागतोय? यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली. वेळ लागला तरी सरकार स्थापन होत आहे हे महत्त्वाचे. काँग्रेस पक्ष हा स्वतःला ‘सेक्युलर’ समजतो. शिवसेनेबरोबर गेलो तर राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतील व अल्पसंख्याकांना काय वाटेल? या चक्रात काँग्रेस अद्याप आहे. देशात अल्पसंख्याक आता कोण, हे कुणीच सांगू शकणार नाही. मुसलमान किंवा ख्रिश्चन हे अल्पसंख्याक म्हणणे हा त्या समाजावर आता अन्याय ठरेल. अल्पसंख्याकांच्या मतांवर राष्ट्रीय राजकारण करण्याचा काळ संपला आहे. झैलसिंग हे देशाच्या राजकारणातील मोठे नाव. इंदिरा गांधींचे निष्ठावान. ‘ज्या देशात नव्वद टक्के समाज हिंदू संस्कृतीवर श्रद्धा ठेवतो त्या देशात फक्त अल्पसंख्याकांचे राजकारण किती काळ टिकेल?’ असा प्रश्न त्यांनी अखेरच्या काळात निर्माण केला व तो योग्य आहे. भारतीय घटना ‘सेक्युलर’ ढाच्यावर आधारित आहे व सर्व धर्म, पंथ, जाती, दुर्बलांना समान न्यायाच्या तत्त्वावर घटनेचा पाया उभा आहे हे लक्षात घेतले तर हा देश चुकीच्या मार्गाने कधीच गेला नाही. सध्याचे पंतप्रधान मोदी हे सगळय़ात जास्त ‘सेक्युलर’ आहेत. पंतप्रधान म्हणून ते भारतीय घटनेचे पालन करतात. अनेकदा ते इस्लामी राष्ट्रात प्रवास करतात. सौदी-अरेबियातील मशिदीत जातात. माझा संस्कार हिंदू आहे म्हणून मी इस्लामी राष्ट्रप्रमुखांना भेटणार नाही व त्यांच्या देशात पाऊल ठेवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली नाही. हे सर्व सांगायचे ते यासाठीच की, आपल्या देशात ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ कुणालाच समजला नाही. सेक्युलर म्हणजे मुसलमानांचेच लांगूलचालन या भूमिकेच्या गुंत्यात जे अडकले त्यांचे राष्ट्रीय राजकारण संपले. त्यामुळे शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेसाठी गेलोच तर काय होईल, या संभ्रमावस्थेतून बाहेर पडायला काँग्रेसला वेळ लागला.

संभ्रमावस्था!

काँग्रेस ज्या संभ्रमावस्थेत अडकली त्या संभ्रमावस्थेत भाजप कधीच फसला नाही. एखाद्या राज्यात किंवा देशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने ‘तत्त्व’, ‘विचार’, भूमिकांना गुंडाळून ठेवले. त्यामुळेच आज देशभरात भाजपचा विस्तार झाला. भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती यांच्या पक्षाशी ‘युती’ करून सत्ता स्थापन केली आहे. हे सर्व पक्के सेक्युलर व हिंदुत्वाच्या विचारसरणीच्या विरोधात होते. रामविलास पासवान, नितीश कुमार हे कधीच हिंदुत्ववादी नव्हते. कश्मीरात मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पाकिस्तानधार्जिणा किंवा ‘स्वतंत्र कश्मीर’चा पुरस्कर्ता म्हणून बदनाम असतानाही भाजपने त्यांच्याशी युती केली आहे. ‘प्रसंगी हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवून सत्ता स्थापना केल्यामुळेच आज भाजप देशभरात विस्तारला गेला व ‘सेक्युलर’वादाचा अनर्थ केल्याने काँग्रेस आहे तो पाठिंबाही घालवून बसली.

सेक्युलर कोण?

‘सेक्युलर’ ही विचारसरणी आहे, भूमिका नाही. धर्माच्या आधारावर निर्माण झालेली पाकिस्तानसारखी राष्ट्रे साफ रसातळाला गेली. हिंदुस्थानचे तसे झाले नाही. वीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते, पण धर्मांध नव्हते. बाळासाहेब ठाकरे हे शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वाचे कठोर विरोधक होते. जन्मदाखल्यांवरील जात, धर्माचा रकानाच रद्द करा ही बाळासाहेबांची भूमिका. देश ‘निधर्मी’ आहे ना? मग न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून कसल्या शपथा घेता? भारतीय घटनेवर हात ठेवून शपथ घ्या! इतकी सरळ ‘सेक्युलर’ भूमिका घेणारे बाळासाहेबच होते. त्यामुळे सेक्युलर काय व सेक्युलर कोण? या चक्कीत किती दळण दळायचे? भारतीय घटनेतला ‘सेक्युलर’वाद वेगळा तर काँग्रेससारख्या पक्षांनी स्वीकारलेला सेक्युलरवाद वेगळा. राममंदिर ही नव्वद टक्के लोकांची श्रद्धा असेल व त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मोहोर उठवली असेल तर त्यास विरोध करणे हा ‘सेक्युलरवाद’ नाही. शिवसेनेसारखा पक्ष हा प्रखर राष्ट्रवादी आहे; कारण तो देशातील सर्व विचारसरणीचा स्वीकार करतो. हिंदुत्व ही सगळय़ात मोठी विचारसरणी आहेच व त्यास ठोकरून कुणालाही पुढे जाता येत नाही.

शिवाजीराजांचे स्वराज्य
महाराष्ट्रात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होत आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नव्या आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होत नाही हा भाजपच्या राजकारणास आतापर्यंतचा सगळय़ात मोठा धक्का आहे. भाजपशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात होणार नाही असे शेवटपर्यंत दावे केले गेले. ते फोल ठरले. भाजप नसेल तर कोणतेही सरकार राज्यात टिकणार नाही, असा शाप देण्यात येत आहे. हा शापसुद्धा कुचकामी ठरेल. ‘शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करू नका. भाजपसोबत या. हवे ते देतो. अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपदही देऊ,’ असे निरोप भाजपकडून शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला जात होते. हे आश्चर्यकारक आहे. शिवसेनेला ठरल्याप्रमाणे देणार नाही, पण इतरांना देऊ हा द्वेष भाजपला घेऊन बुडत आहे. महाराष्ट्राचे सरकार टिकू द्यायचे नाही ही दिल्लीतील सत्ताधाऱयांची मानसिकता असेल तर या सर्व प्रयोगांत त्यांना अपयश येईल. श्री. शरद पवार व श्री. अहमद पटेल यांनी सरकार पाच वर्षे चालवायचेच व राज्याच्या हितासाठी चालवायचे हे मनावर घेतले आहे. शिवाजीराजांचे हिंदवी स्वराज्य समान न्यायाच्या तत्त्वावर निर्माण झाले. त्यालाच निधर्मीवाद म्हणतात. ‘सेक्युलर’ तत्त्वाच्या मुद्द्यावर सरकार टिकेल काय? हा प्रश्न निरर्थक आहे. शिवाजी महाराजांच्या मार्गाने सरकार चालत राहील. शिवरायांचे स्वराज्य सगळय़ांचेच होते. नव्या राज्याची घडी त्यापेक्षा वेगळी नसेल.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या