रोखठोक : ‘युद्ध’ नावाचे राजकारण

rokhthokपाकव्याप्त कश्मीरवर हवाई हल्ला करून पंतप्रधान मोदी यांनी देशाचा माहोल बदलून टाकला. सरकारने कार्यकाळ पूर्ण केला. लोकसभा कोणत्याही क्षणी बरखास्त होईल. निवडणुकांच्या उंबरठ्यावर देश उभा आहे अशा वेळी पुलवामा घडले व युद्धज्वराचा भडका उडवला. युद्ध हे एक प्रकारे राजकारणच असते. त्या राजकारणात सैनिकांची अस्मिता जपली जावी हीच इच्छा!

‘‘पाकिस्तानवरील हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल. कर्नाटकातील 28 पैकी 22 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकू!’’

श्री. येडुरप्पा, कर्नाटकातील भाजप नेते आपल्या देशातील राजकारण कोणत्या पातळीपर्यंत घसरू शकते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. पाकव्याप्त कश्मीरवर आपल्या वायुदलाने हवाई हल्ला केला. हा हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचा व हिंदुस्थानी जवानांच्या अस्मितेचाच विषय आहे. पंतप्रधान मोदी यांनी लष्कराला बदला घेण्याची संपूर्ण मुभा दिल्यानंतर हवाई दलाने जवानांच्या सांडलेल्या रक्ताचा बदला घेतला. देशातले वातावरण त्यामुळे बदलले व त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जागा कोणत्या राज्यात किती वाढतील याची गणिते मांडली जाऊ लागली. पुलवामातील दहशतवादी हल्ला व त्यानंतर आपल्या जवानांनी केलेला प्रतिहल्ला याचा राजकीय फायदा-तोटा मांडला जात आहे. त्या फायद्या-तोट्यासाठीच हे सर्व चालले आहे काय अशी टीका सुरू आहे व ती योग्य नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेले आमचे एक मिग विमान पाकिस्तानने पाडले व जखमी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाक लष्कराने ताब्यात घेतले. अर्थात त्यांना हिंदुस्थानात परत पाठविण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी केली. युद्ध सुरू आहे तोपर्यंत राजकीय मोर्चेबांधणी व राजकीय विधाने थांबवा. हे इतके केले तरी मोठीच देशसेवा राजकारण्यांकडून घडेल. सीमेवर सैनिक लढत आहेत व भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री ‘बूथ लेव्हल’ कार्यकर्त्यांची शिबिरे घेत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री सगळेच त्यात व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्ष करतो तेव्हा वाईट वाटते. राजकारण कधीही करता येईल. निवडणुका येतील व जातील, पण देश व जवानांची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची. युद्ध हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘डाव’ आहे असे मानणे हा जवानांचा अपमान ठरेल. राजकारणातील प्रत्येकाने याचे भान ठेवायला हवे. पण इकडे येडुरप्पा कर्नाटकातील जागांचा हिशेब करीत आहेत आणि तिकडे पाकिस्तानात विंग कमांडर अभिनंदन ‘युद्धकैदी’ म्हणून नवा संघर्ष करीत आहे. मनात संवेदनेची ज्योत पेटवून त्या उजेडात हे सर्व पाहायला हवे.

कंबरडे मोडले
हिंदुस्थानी वायुसेनेने पाकव्याप्त कश्मीरात घुसून दहशतवाद्यांचे ‘कॅम्प’ उद्ध्वस्त केले. बालाकोटमध्ये हे कॅम्प होते. त्या कारवाईत 300 दहशतवादी ठार झाले. त्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले. हाफीज सईद आणि मसूद अजहर या दोन सैतानांनी हिंदुस्थानविरुद्ध जे छुपे युद्ध पुकारले त्याला पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा आहे. खुल्या मैदानात, आकाशात आणि समुद्रावरील युद्धात हिंदुस्थानसमोर आपला निभाव लागणार नाही हे माहीत असल्यानेच पाकिस्तानने हे छुपे युद्ध सुरू केले. हिंदुस्थानातील मोठय़ा शहरांत दंगली घडवणे, बॉम्बस्फोट घडवून माणसे मारणे, कश्मीरातील लष्करी तळांवर हल्ले करणे, वारंवार सीमेपलीकडून हल्ले करणे, हिंदुस्थानातील मुसलमानांच्या प्रश्नांत नाक खुपसून धार्मिक उन्माद वाढवणे हा त्याच छुप्या युद्धाचा एक भाग आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानबरोबरच्या प्रत्येक युद्धात सपशेल मार खाल्ला. त्यांची पुरती बेइज्जती झाली. हिंदुस्थानशी शंभर वर्षे युद्ध करू असे गरजणार्‍या झुल्फिकार भुत्तोला त्यांच्याच लोकांनी फासावर लटकवले. जनरल याह्या खानपासून जनरल झियापर्यंत सगळे खतम झाले. हिंदुस्थानवर कारगील युद्ध लादणारे जनरल मुशर्रफही पाकिस्तानातून परागंदा झाले आहेत व पाकिस्तानला हिंदुस्थानशी युद्ध परवडणार नाही असे अनुभवाचे बोल ते आता सांगत आहेत. तरीही दोन्ही देशांत युद्धज्वर भडकला आहे. पुलवामा येथे आपले 40 जवान दहशतवाद्यांनी मारले. त्यानंतर पाकिस्तानवर आता तरी कडक कारवाई व्हावी अशा संतापाच्या ज्वाळा देशात भडकल्या. सोमवारी भल्या पहाटे पाकिस्तानात आमची ‘मिराज’ लढाऊ विमाने घुसली व दहशतवादी कॅम्पवर हल्ले करून सगळे सुखरूप परत आले. त्यामुळे विजयाचा राजकीय उत्सव सुरू झाला आहे.

40 जवानांच्या हत्या, त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अद्याप सुकले नाहीत आणि संपूर्ण कारवाई अद्याप संपलेली नाही. कोणतीही रणभूमी ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली नाही असे लोक सरकारला व सैन्याला युद्ध कसे लढावे ते अशा वेळी सांगताना दिसतात. युद्ध या विषयाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलली आहे. युद्धाचे श्रेय सैन्यास देण्याऐवजी राजकीय पक्षांना देण्याची चढाओढ सुरू होते व त्या युद्धज्वरात देशापुढील इतर सर्व प्रश्न गौण ठरतात. या प्रश्नांवर सत्य बोलणारे, लिहिणारे यापुढे देशद्रोही ठरतील व त्यांना एक तर गोळय़ा घाला किंवा फासावर लटकवा असे जाहीरपणे बोलले जाईल.

पाक नष्ट करा!
पाकिस्तानसारखा देश जगाच्या नकाशावर शिल्लक राहू नये अशा मताचा मी आहे. आधीच्या दोन युद्धांत पराभव होऊनही पाकिस्तान पुनः पुन्हा कश्मीरप्रश्नी आमच्याशी छुपे युद्ध खेळत असेल व जवानांचे रक्त सांडत असेल तर पाकिस्तान बेचिराख व्हावा व इंदिरा गांधींनी जे 1971 साली केले तेच आजचे पंतप्रधान मोदी यांनी करावे ही लोकभावना आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हाती देशाची सत्ता आल्यापासून कश्मीरातील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. जवानांची बलिदाने जास्त झाली. पठाणकोट, उरी व आता पुलवामासारखे मोठे हल्ले प्रचंड नुकसान करून गेले. पंतप्रधान मोदी आता काय करणार, या प्रश्नाचे उत्तर आता आपल्या हवाई दलाने दिले आहे.

युद्ध हे राजकारण
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध हा सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे. युद्धाला Continuation of politics by other means असे कुणीतरी म्हटले आहे. राजकारण करण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग युद्ध हा आहे. राजकारणातील अनेक साधनांपैकी युद्ध हे एक व धार्मिक दंगे ही महत्त्वाची साधना आहे. युद्ध या उपायाचा अवलंब केव्हा ना केव्हा तरी करावाच लागतो. त्याशिवाय राजकीय हेतू साध्य होत नाहीत हा जगाचा अनुभव आहे. त्यामुळे जगाच्या इतिहासातील अनेक मोठय़ा व्यक्तींनी युद्धाबद्दल तिरस्कार बाळगला नाही. ज्या वेळी जे साधन जास्त उपयुक्त ठरेल असे वाटेल ते साधन पुढारी बिनधास्तपणे वापरत असतात. रामायण, महाभारत त्यातूनच घडले व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्धे, सेनापती अशाच युद्धांतून जगद्विख्यात झाले. 1971 चे युद्ध जिंकून इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केल्यावर त्या ‘दुर्गा’ ठरल्या. आता पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या ‘56 इंच छाती’वर टीका करणार्‍यांची तोंडे बंद झाली. अर्थात त्यासाठी आपल्या 40 जवानांना पुलवामात शहीद व्हावे लागले हेसुद्धा तितकेच खरे!

Twitter – @rautsanjay61
Gmail – rautsanjay61@gmail.com