
मतदार यादीतील घोळ चव्हाट्यावर आणताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले होते. त्यात अनेक मतदारांचे खोली क्रमांक शून्य दाखवल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. त्या आरोपांनंतर आता निवडणूक आयोगाने पर्यायी विचार सुरू केला आहे. यापुढे मतदारांच्या घरांना काल्पनिक क्रमांक देणे बंद केले जाणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी करताना त्यांच्या घरांना दिलेल्या 00 किंवा 777777 किंवा 99999 क्रमांकाचा मुद्दा राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रचंड गाजला होता. त्यावर निवडणूक आयुक्तांनी खुलासा केला होता. ज्यांच्याकडे घर नाही अशा लोकांच्या घरांना शून्य क्रमांक दिल्याचे त्यांनी सांगितले होते, मात्र हा खुलासा लोकांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे आता ती त्रुटी दूर केली जाणार आहे. घर क्रमांक नसेल तर तो नमूदच करायचा नाही असा एक विचार आहे. घर क्रमांकाऐवजी आधार क्रमांक नमूद करण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे.
देशात 17.73 लाख लोकांकडे घर नाही!
मागील जनगणनेनुसार, देशातील सुमारे 17 लाख 73 हजार लोक बेघर आहेत. त्यांच्याकडे घर क्रमांक नाही. शहरी भागात सुमारे 9 लाख 38 हजार आणि ग्रामीण भागात 8 लाख 34 हजार लोकांची नोंदणी झाली होती. नागरी संघटनांनीही या संख्येवर आक्षेप घेतला होता. बेघर लोकांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे, असे संघटनांचे म्हणणे होते. खरे चित्र 2027 च्या जनगणनेत समोर येणार आहे. या जनगणनेच्या वेळी घर क्रमांक योग्यरीत्या नोंदवण्यासाठी आणि घरांसमोर पत्ते लिहिण्यासाठी एक ठोस व्यवस्था तयार केली जाईल अशी आशा आहे.