चांदीच्या प्लेटस्, कांस्याच्या थाळीतून पुरणपोळी, आमरसाची मेजवानी; मंत्री परिषदेच्या बैठकीचा असा हा थाटमाट

मंत्री परिषदेच्या विशेष बैठकीसाठी श्रीक्षेत्र चौंडीमध्ये आलेल्या मंत्र्यांचा थाट हा चर्चेचा विषय ठरला आहे. मंत्री परिषद बैठकीसाठी ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप होता. भोजन कक्षातही खास व्यवस्था केली होती. कांस्य धातू आणि चांदीच्या थाळ्या, ग्लास, वाटय़ा होत्या. पुरणपोळी, आमरस, कर्जतची स्पेशल शिपी आमटी असा बेत होता.

मंत्री परिषद बैठक कक्षाशेजारी भोजन कक्ष उभारण्यात आला होता. भोजनामध्ये पुरणपोळी, त्यावर गावरान तूप, आमरस, शिपी आमटी, ताक, मासवडी, कोथिंबीरवडी, कांदाभजी, खारे वांगे, वांगा भरीत, हुलगे उसळ, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, ज्वारी व बाजरीची भाकरी, अशा एपूण 18 खाद्यपदार्थांचा आस्वाद मंत्र्यांनी घेतला. मंत्र्यांना हे भोजन कांस्य धातूच्या थाळीत व चांदीच्या प्लेटमध्ये वाढण्यात आले होते. त्यासोबतच कांस्य व चांदीचे ग्लास, वाटय़ाही होत्या. एका कांस्य थाळीची किंमत 3999 रुपये आहे. मंत्र्यांच्या भोजनासाठी केटरिंगचालकाने खास कांस्य धातूचे 100 नग विकत घेतले. ही भोजनव्यवस्था मुंबईतील ‘मिनी पंजाब’ या केटरर्सकडे सोपविण्यात आली होती. विविध डाळींच्या मिश्रणातून तयार होणारी रस्सेदार ‘शिपी आमटी’ ही खास कर्जतची ओळख आहे. ही आमटी कर्जतमध्ये वेगळ्या पद्धतीने बनविली जाते. स्थानिक पद्धतीप्रमाणे शिपी आमटी तयार करण्याची जबाबदारी ‘मिनी पंजाब’ केटरर्सने स्थानिक महिलांवर सोपविली होती. ती त्यांच्याकडून तयार करून घेतली.

अनोख्या पद्धतीने केला सत्कार

मंत्री परिषद बैठकस्थळी सभापती प्रा. राम शिंदे व चौंडी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मंत्र्यांचा सत्कार धनगर समाजाची परंपरा जपणारी घोंगडी, काठी यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती, ‘अहिल्यादेवी होळकर ः गौरवगाथा लोकमातेची’ हे पुस्तक व शाल देऊन करण्यात आला.

5 कि.मी. अंतरापासून पोलीस बंदोबस्त

मंत्री परिषद बैठक पहिल्यांदाच ग्रामीण भागात होत होती. यासाठी चौंडी गावात खास व्यवस्था करण्यात आली. अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील चापडगाव येथून सुमारे पाच कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र चौंडी हे तीर्थक्षेत्र आहे. चापडगाव येथूनच पोलिसांनी बंदोबस्तासाठी बॅरिकेडिंग केले होते. बैठकीसाठी येणाऱयांची ठिकठिकाणी तपासणी केली जात होती. त्यानंतरच त्यांना पुढे जाऊ दिले जात होते. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कऱहाळे दोन दिवसांपासून चौंडीमध्ये मुक्काम ठोपून होते. सुमारे एक हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा बंदोबस्त तैनात होता.