लोकलवर बाटली फेकल्यानंतर आरपीएफची जोरदार मोहीम

सामना ऑनलाईन, मुंबई

धावत्या लोकलवर बीअरची बाटली फेकल्याने दोन महिला जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने रुळांच्या कडेला बसून दारू पिणारे, पत्ते खेळणारे व टपोरीगिरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र प्रारंभ केले आहे. रविवारपासून या कारवाईत पाच जणांना अटक केल्याचे रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले. डोंबिवली लोकलच्या महिला डब्यावर बीअरची बाटली फेकण्याची घटना घडल्यानंतर सुरक्षा दलाने ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून शॉर्टकट केल्याचे निदर्शनास आले आहे. या भिंतीबाहेरच दारूचे एक दुकानही आहे. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन येथे हा प्रकार घडला असावा असे अधिकाऱ्यांना वाटत आहे. ही संरक्षक भिंत पुन्हा तयार करण्यात येणार असून रेल्वेच्या संबंधित विभागाशी रेल्वे सुरक्षा दलाने चर्चाही केली आहे. रुळांच्या कडेला दारू पिणारे, पत्ते खेळणारे, गर्दुल्ले यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. सँडहर्स्ट रोड ते मस्जिद बंदर, मस्जिद स्थानक ते भायखळा, घाटकोपर ते विक्रोळी, ठाणे ते कळवा, मुंब्रा ते दिवा या स्थानकांदरम्यान आरपीएफने जादा लक्ष केंद्रित केले आहे.