धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचविला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका प्रवाशाचा मोठा अपघात होता होता राहिला. आरपीएफ जवान ऋतुराज राठोड यांनी प्रसंगावधान दाखवीत त्या प्रवासाला ट्रेन व फलाटाच्या मधल्या गॅपमध्ये पडण्यापासून वाचविले. ही घटना शुक्रवारी सकाळी दादर स्थानकात घडली. या जवानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्र. 6 वर अमरावती एक्सप्रेसमधून अकोला येथील एक प्रवासी सामान घेण्यासाठी पुन्हा ट्रेनमध्ये चढला. तो ट्रेनमधून उतरेपर्यंत ट्रेन सुरू झाली. त्यामुळे तो चालत्या ट्रेनमधून उतरू लागला. मात्र त्याचा तोल गेल्याने तो फलाटाखाली पडणार होता. मात्र त्यावेळी ड्यूटीवरील आरपीएफचे जवान ऋतुराज राठोड यांनी या प्रवाशाला प्रसंगावधान राखत बाजूला काढत त्याचे प्राण वाचविले. राठोड यांच्या कर्तव्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.