ऑस्करच्या शर्यतीत ‘आरआरआर’ची एंट्रीः निर्मात्यांनी 14 विभागांत नोंदवले  नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी परदेशी भाषा विभागात हिंदुस्थानकडून ‘आरआरआर’ या चित्रपटाला पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची अधिकृतरीत्या निवड झाल्यानंतर अनेक चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर, ऑस्करच्या शर्यतीत ‘आरआरआर’ने एंट्री घेतली असून निर्मात्यांनी तब्बल 14 विभागांसाठी या चित्रपटाचे नाव नोंदवले आहे.

ज्युनिअर एनटीआर, रामचरण यांच्या अभिनयाने सजलेल्या एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाची ऑस्करवारी हुकल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला होता. अखेर, निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव तब्बल 14 विभागांमध्ये नॉमिनेशनसाठी पाठवले आहे. एफवायसी अर्थात फॉर युवर कन्सिडरेशन या मोहिमेत त्यांनी भाग घेतला आहे. सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, दिग्दर्शक, अभिनेता, सहाय्यक अभिनेता – अभिनेत्री, ओरिजिनल गाणे, ओरिजिनल स्कोअर यांच्यासह स्क्रीन प्ले, सिनेमॅटोग्राफी, प्रॉडक्शन डिझाइन, कॉस्च्युम डिझाइन, साऊंड, फिल्म एडिटिंग, मेकअप आणि हेअरस्टायलिंग या विभागांसाठी नाव नोंदवण्यात आले आहे.