
सामना ऑनालाईन । नवी दिल्ली
आधार क्रमांक जाहीर केल्याने आपली खाजगी माहिती फुटली नसल्याचे ट्रायचे प्रमुख आर.एस, शर्मा यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेच्या मुलाखातीत त्यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार क्रमांक जाहीर केला आणि हॅक करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर ट्विटरवर या प्रकरणावरून मोठे वादंग उठले होते.
शर्मा म्हणाले की “आधार क्रमांक जाहीर केल्याने माझी खाजगी माहिती बाहेर नाही आली, जी काही माहिती बाहेर आली आहे ती आधार क्रमांक न वापरताही काढता येते.” यूआईडीएआई चे माजी महासंचालक हे आधार कार्यक्रमाचे समर्थक आहेत, ९ ऑगस्ट दिवशी शर्मा हे ट्रायच्या अध्यक्षपदाहून निवृत्त होणार आहेत.
हॅकरने ट्विटरवर जेव्हा त्यांचा मोबाईल क्रमांक जाहिर केला तेव्हा एकच हलकल्लोळ उडाला होता. या प्रकरणी शर्मा म्हणाले की “आधारचे आव्हान मी दिले नसून हे आव्हान मला दिले होते. मला कुणीतरी सांगितले की आधार क्रमांक जाहीर करून आधारच्या खाजगीपणाबद्दल तुम्हीच का हे पाऊल उचलत नाही. म्हणून मी आधार क्रमांक जाहीर केला होता.”
गुंतागुंतीच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोशल मिडिया हे चांगले व्यासपीठ नसल्याचे त्यांनी सांगितले. ट्रायच्या अध्यक्षांनी आपला आधार क्रमांक जाहीर केल्यानंतर यूआईडीएआई ने लोकांना आवाहन केले की आपला १२ अंकी आधार क्रमांक जाहीर करून कुणालाच आव्हान देऊ नका.























































