
“हिंदुत्व म्हणजे सर्व लोकांसोबत एकजूटपणे चालते ती संस्कृती होय. सर्वांना बरोबर घेऊन जाते तेच खरे हिंदुत्व. केवळ पूजा पद्धतींवरून आपापसात भेदभाव करणे चुकीचे आहे’’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची विशाल संकल्पना पुन्हा स्पष्ट केली आहे.
भागवत उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि बुद्धिजीवींसह विविध लोकांना सुरत आरएसएस मुख्यालयात भेटले. नंतर संध्याकाळी त्यांनी शहरातील विज्ञान केंद्रात हिंदुत्वावर विचारवंतांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी संघाची हिंदुत्वाबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
हिंदुत्वाचे तीन अर्थ आहेत – दर्शनिक, लौकिक आणि राष्ट्रीयतावाद (तत्त्वज्ञान, सांसारिक आणि राष्ट्रीय). सिंधू नदीच्या दक्षिणेला राहणारे हिंदू म्हणून ओळखले जातात, असे सांगून सरसंघचालक भागवत म्हणाले, एक समान संस्कृती असलेला समाज हे एक राष्ट्र आहे. आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज आहे. समर्थ राष्ट्र उभारणीसाठी हिंदुस्थानी नागरिकांनी धर्म, जाती-पातीभेद विसरून एकदिलाने काम करायला हवे असे आवाहनही सरसंघचालकांनी यावेळी केले. सुरतमधील या मेळाव्याला डॉक्टर, इंजिनीअर, चार्टर्ड अकाऊंटंट, प्राध्यापक, शिक्षक, वकील आणि विचारवंत यांच्यासह समाजातील विविध घटकांतील दीडशेहून अधिक लोक यावेळी उपस्थित होते.
‘सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच’ या वक्तव्यावरून उडाली होती खळबळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते. “सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणे चुकीचे आहे’’ असे त्यांनी यावेळी सांगितले होते. तसेच जमावातून एखाद्याची हत्या करणारे लोक हिंदुत्वविरोधी असल्याचे ते म्हणाले होते. भागवत यांच्या डीएनएबाबतच्या वक्तव्याला विविध धार्मिक नेत्यांनी आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली होती.




























































