मार्क्सवाद संपलाय, त्याची उत्तरक्रिया आपल्यालाच करायचीय!

तथाकथित सांस्कृतिक मार्क्सवाद हे फक्त शब्द आहेत. त्यात संस्कृती नाही आणि मार्क्सवादही नाही. सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला. सत्य दडपून असत्यच सत्य असल्याचा भ्रम निर्माण केला. डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याची उत्तरक्रिया परंपरेने आपल्यालाच करावी लागेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी डाव्या विचारसरणीवर पुण्यात हल्लाबोल केला.
अभिजित जोग लिखित ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांती श्री पंडित, प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव बर्वे यावेळी उपस्थित होते. डाव्यांविरोधात लढताना काहींना प्रतिकार करावा लागेल. भ्रमाचा पडदा फाडावा लागेल. खोटे उघडे करावे लागेल. लोकांनी भ्रमित होऊ नये, याची काळजीही घ्यायला हवी. आपण कोण आहोत, परंपरा काय, विचारधन, विज्ञान काय हे कळले पाहिजे. डाव्यांमुळे सगळे जग त्रस्त आहे. दडपले गेले आहे. ही लढाई लढणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक आहे, असे भागवत म्हणाले.

आज आपल्याला दिसतो हा संघर्ष नवा नाही. देव आणि असुरांमधील संघर्षाचेच हे आधुनिक रूप आहे. डाव्यांच्या या संकटातून वाचवण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानी संस्कृती आणि सनातन मूल्यांत आहे. डाव्यांचा विमर्श खोडून काढण्यासाठी सत्य, करुणा, सुचिता आणि तेजस या चतुःसूत्रीचा अंगीकार समाजाने केला पाहिजे. आपली सनातन मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजेत. सनातन मूल्यांची कास धरून सर्व समाज हे काम करू शकतो. त्यासाठी अशी अनेक पुस्तके सर्व भाषांमधून प्रकाशित झाली पाहिजेत. अन्य मार्गांनीही आपली मूल्ये, आपला विचार घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. हे कोणा एका संघटनेचे काम नसून सर्व समाजाचे हे दायित्व आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

‘जेएनयू ‘पेक्षा अधिक डावे पुणे विद्यापीठात

डाव्यांनी १९६९ मध्ये कॅबिनेट मंत्रिपद नाकारत ‘जेएनयू’ ताब्यात घेतले. तेथूनच त्यांनी आपले विखारी विचार पसरवले. ‘जेएनयू’ पेक्षा अधिक डावे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहेत. त्यांचा त्रास मी 32२ वर्षे सहन केला. मात्र त्या बळावरच मी ‘जेएनयू’ मध्ये टिकू शकले, असे डॉ. शांतीश्री पंडित म्हणाल्या.