संघाची बंगळुरूत बैठक होणार, CAA-NRCवरही चर्चा होण्याची शक्यता

459

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बंगळुरूमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. CoronaVirus च्या भीतीमुळे अनेक कार्यक्रम रद्द केले जात आहे. मात्र संघाची ही बैठक होणार असून ती पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले आहे. ही बैठक वर्षातून एकदाच होते. 10 मार्च रोजी या बैठकीच्या अनुषंगाने एक प्राथमिक बैठक होणार असून या बैठकीला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि सहा सरकार्यवाह सहभागी होणार आहेत. मुख्य बैठकीमध्ये जे विषय येणार आहेत त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. 15 ते 17 मार्च दरम्यान मुख्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या काळामध्ये नागरिकत्व संशोधन कायदा, राष्ट्रीय नागरीक नोंदणी आणि राम मंदिराच्या विषयांसंदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे.

बंगळुरूतील चेन्नलहळ्ळी इथे असलेल्या जनसेवा विद्या केंद्रात ही बैठक पार पडणार आहे. 10 तारखेला संघाचे प्रमुख सरसंघचालक, सरकार्यवाह आणि सहसरकार्यवाहकांची बैठक होईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी या बैठकील सहभागी होतील. 13 आणि 14 मा्र्च रोजी प्रांत प्रचारक, प्रांत कार्यवाह, प्रचारक, कार्यवाह बैठकीला हजर राहतील. मुख्य बैठकीचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाही भैय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये संघाच्या देशभरातील शाखा आणि त्यांच्या विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षात शाखांचा अधिकाधिक गावांमध्ये आणि शहरांमध्ये विस्तार व्हावा असा संघाचा मानस आहे. या बैठकीला 1500 हून अधिक जण उपस्थिती लावतील असे सांगितले जात आहे.

या बैठकीमध्ये अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मंदिरासाठीच्या ट्रस्टमध्ये नेमण्यात आलेले सरचिटणीस चंपत राय हे संघाचे प्रचारक आहेत तसेच विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. राय हे राम मंदिर निर्माणासंदर्भातील आतापर्यंतची प्रगती आणि आगामी योजनेसंदर्भात त्यांचे म्हणणे मांडण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या