इन्फोसिस विरुद्ध पांचजन्य; देशद्रोही, नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘इन्फोसिस’च्या माध्यमातून देशद्रोही, नक्षलींना मदत होत असल्याचा संशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ साप्ताहिकात व्यक्त करण्यात आला आहे. ‘इन्फोसिस’ने देशद्रोही, नक्षलवादी आणि तुकडे-तुकडे गँगला अनेकदा मदत केली असल्याचे आरोप आहेत परंतु त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत असेही या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘पांचजन्य’मधील ‘साख और आघात’ या लेखात ही टीका करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच प्राप्तीकराच्या वेब पोर्टलमध्ये सतत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे देशातील करदात्यांची गैरसोय होऊन त्यांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. त्याच आधारे ‘पांचजन्य’मध्ये हा आरोप करण्यात आला आहे. ही दोन्ही वेब पोर्टल इन्पहसिसने तयार केली आहेत. देशाची अर्थव्यवस्था जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा हा कट असू शकतो असे लेखात म्हटले आहे.

इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही ‘पांचजन्य’च्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ‘ऊंची उडान, फिका पकवान’ अशी टीकाही या लेखात कंपनीवर करण्यात आली आहे. देशविरोधी शक्ती इन्फोसिसच्या माध्यमातून काम करत नाहीत ना अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे.

हा लेखच देशविरोधी

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘पांचजन्य’मध्ये प्रसिध्द झालेला हा लेखच देशविरोधी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी हिंदुस्थानला जगामध्ये नाव मिळवून दिले. अशा कंपनीविरुध्द संघाच्या साप्ताहिकाने केलेले हे लेखन उद्वेगजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संघाने हात झटकले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या प्रकरणी हात झटकले आहेत. ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नाही. त्यात इन्फोसिससंदर्भात आलेला लेख हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. त्या लेखातील मजकुराशी संघाचा संबंध जोडू नये असे संघाचे प्रवत्ते सुनील आंबेरकर यांनी म्हटले आहे. इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान आहे. त्या कंपनीच्या वेबसाईटबद्दल काही मुद्दे असू शकतात असेही आंबेरकर यांनी म्हटले आहे.