
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. शहरात विविध ठिकाणी कोरोना सेन्टर्स आणि विशेष कोरोना रुग्णालये उभारण्यात आलीं आहेत. मात्र, काही वेळा रुग्णालयात बेड नसल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णालये आणि त्यात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती ऑनलाईन करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा वेळी काही रुग्णांना वेळेत रुग्णालयात प्रवेश मिळत नाही. त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागते. त्याचबरोबर कोरोना रुग्णालय आणि अन्य खासगी रुग्णालयाची माहिती सामान्य नागरिकांनाही लगेच मिळत नाही. अशी माहिती उपलब्ध झाली तर कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल. त्यामुळे मुंबईतील पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालये, तसेच कोरोना सेन्टर्स यात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती एका क्लीकवर मिळावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.




























































