
मुंबई शहरातील रस्त्यांवर बेफिकीरपणे दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असताना हा नियम सर्रास मोडला जात आहे. याविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई तीव्र केली आहे. शहरातील ताडदेव, वडाळा, बोरिवली आणि अंधेरी येथील आरटीओ कार्यालयांनी मागील वर्षभरात 15 हजारांहून अधिक दुचाकीचालकांवर हेल्मेटविना दुचाकी चालवल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली.
शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेफिकीरपणे दुचाकी चालवणाऱया दुचाकीचालकांमुळे पादचाऱयांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यामुळे दुचाकीचालक स्वतःचा जीव गमावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आरटीओने विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याच्या गुन्ह्यात कारवाईची मोहिम तीव्र केली आहे. आरटीओची पथके ठिकठिकाणी गस्त घालून विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करीत आहेत.
ताडदेव आरटीओने जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये एकूण 1481 दुचाकीचालकांवर कारवाई केली. या मोहिमेदरम्यान 42,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वडाळा आरटीओच्या वायुवेग पथकांनी मागील वर्षभरात 6075 दुचाकीचालकांना दंडाचा दणका दिला. अंधेरी आरटीओने एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या 10 महिन्यांत सर्वाधिक कारवाई करताना 5190 विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पकडून त्यांना 51 लाख 90 हजार 999 रुपयांचा दंड ठोठावला.
बोरिवली आरटीओने 2924 विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली. रस्ते अपघातांमध्ये दुचाकीचालकांच्या चुका अनेकदा कारणीभूत ठरल्याचे उघड होते. याच पार्श्वभूमीवर आरटीओकडून विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱयांविरोधातील कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.
सध्या आरटीओकडून रस्ते सुरक्षा अभियान राबवले जात आहे. दुचाकीचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे याकडे रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत विशेष लक्ष पेंद्रीत केले जाणार आहे. विनाहेल्मेटच्या गुन्ह्यात दंडाची रक्कम वाढवली जाऊ शकते का, याचीही पडताळणी केली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
























































